जवाब दो.. जॉब दो.. म्हणत रा. युवक काँग्रेसचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नाही. याबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

लातूर : देशातील युवकांसाठी 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देऊ, असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांची दिशाभूल केली. नवीन रोजगार तर सोडा आहे तो रोजगारसुध्दा नोटाबंदीमुळे गमवावा लागला, असा आरोप करत  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जवाब दो... जॉब दो... आंदोलन बुधवारी करण्यात आले. या आंदोलनाला जिल्ह्यातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झाली नाही. याबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही पक्षातर्फे देण्यात आले.

या आंदोलनात लातूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रवीण नाबदे, बस्वराज पाटील नागराळकर, बाबासाहेब पाटील, मकरंद सावे, संजय बनसोडे, बबन भोसले, पप्पूभाई कुलकर्णी, प्रशांत पाटील, धनंजय भुरके, गजानन खमितकर, दिलीप सोनकांबळे, बाळासाहेब जाधव, मुन्ना तळेकर, ताज शेख, सय्यद इब्राहीम, संजय शेटे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोदी सरकारने आश्‍वासनांची खैरात केली होती. देशातील बेरोजगारांसाठी दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ, असे सांगणार्‍या मोदी सरकारने एकही रोजगार उपलब्ध करून दिला नसल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. तरुणांना धर्माचे डोस पाजवत त्यांना गुन्हेगारी क्षेत्राकडे वळविले जाऊ लागले आहे. यामुळे तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे, असे नागराळकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Answer me job me NCP morcha in latur