कोणीही यावे अन्‌ तंबू ठोकून राहावे!

विकास गाढवे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

  • जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाला दलालांचा विळखा
  • रजिस्ट्री कार्यालयामुळे वाहतुकीची कोंडी
  • दोन्ही कार्यालयांत रजिस्ट्रीसाठी सुप्त स्पर्धा
  • अनधिकृत व्यक्तीचा कब्जा

लातूर : जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांनाच रान मोकळे झाले आहे. कार्यालयाच्या परिसरात कोणीही यावे अन्‌ तंबू ठोकून राहावे, अशी स्थिती झाली आहे. कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या दोन रजिस्ट्री कार्यालयांमुळे ही स्थिती निर्माण झाली असून, रजिस्ट्रीशी संबंधित अनधिकृत व्यावसायिकांची संख्या परिसरात वाढल्याने अनागोंदी निर्माण झाली आहे.

यातूनच रजिस्ट्रीच्या कामासाठी येणाऱ्यांकडून जागा मिळेल तिथे वाहनांची पार्किंग केली जात असल्याने परिसरात वाहतुकीची कोंडी झाली आहे. परिसरातील कार्यालयात जाण्यासाठी कसरत करावी लागत असून, परिसरातून जिल्हा परिषदेकडे जातानाही सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

अनधिकृत तंबू
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस मुद्रांक व नोंदणी विभागाचे क्रमांक एकचे रजिस्ट्री कार्यालय आहे. जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वीच्या सिडको कार्यालयात क्रमांक दोनचे रजिस्ट्री कार्यालय आहे. दोन्ही कार्यालयांत रजिस्ट्रीसाठी सुप्त स्पर्धा असून त्यातूनच मोठ्या संख्येने दलालांची संख्या वाढली आहे. परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांसाठी परिसरात वाहन पार्किंगचे शेड देण्यात आले आहे. मात्र, मागील काही वर्षांत अधिकृत विक्रेते व दस्तलेखकांऐवजी अनधिकृत व्यक्तींनीच रजिस्ट्री कार्यालयाशी संबंधित कामांवर कब्जा केला आहे.

यासोबत परिसरातही अनधिकृतपणे तंबू ठोकून काही व्यक्ती काम करत असून यात काही चहा व पान विक्रेत्यांचाही समावेश आहे. जागा मिळेल तिथे या लोकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. दिवसागणिक अनधिकृत व्यक्तींकडून कार्यालय परिसरात अतिक्रमण वाढत असून परिसरात असलेल्या कृषी व अन्य कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांची वाहने लावण्यासाठीही जागा मिळत नसल्याची स्थिती आहे. वाहनांची कोठेही पार्किंग होत असल्याने परिसरातील कार्यालयांत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दोन क्रमांकाच्या रजिस्ट्री कार्यालयासमोर मोठ्या संख्येने वाहने लावली जात असल्याने जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. 
व्हिडीयो पाहून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले
दोन नंबरचा पगडा 
पूर्वी लातूर शहरातील भूखंड, घर, जमीन आदी मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची नोंदणी क्रमांक एकच्या रजिस्ट्री कार्यालयात तालुक्‍यातील पूर्व भागासह 47 गावांतील नोंदणी क्रमांक दोनच्या, तर उर्वरित 63 गावांतील नोंदणी मुरूड (ता. लातूर) कार्यालयात सुरू होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी तीनही कार्यालयांचे एकत्रीकरण केले. एकाच शहरात असलेल्या कार्यालयांचे एकत्रीकरण होत असतानाही तालुक्‍यातील कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात आले. यामुळे तीनही कार्यालयांत तालुक्‍यातील लातूर शहरासह सर्व गावांतील नोंदणी (रजिस्ट्री) होऊ लागली. यात मध्यंतरी काही दिवस क्रमांक एकचे कार्यालय रजिस्ट्रीच्या संख्येत आघाडीवर होते. सध्या दोन नंबरच्या कार्यालयाचा पगडा आहे. दोन्ही कार्यालयांशी निगडित कामांवरून दलालांचेही दोन गट आहेत. 
हैदराबाद घटनेबाबत काय म्हणाले अॅड. उज्वल निकम, वाचा सविस्तर
शिस्त लावण्याची गरज 
जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींनी ठिय्या मारल्याने कोंडी निर्माण झाली आहे. या कार्यालयात या व्यक्ती कोणाच्या परवानगीने परिसरातील जागेचा वापर करतात, त्यांना कोणी परवानगी दिली आहे, या व्यक्ती जागेचे भाडे सरकारला देतात का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. कार्यालयातील सध्या व पूर्वी कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या तसेच सेवानिवृत्त व्यक्तीही रजिस्ट्रीचे काम करताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे बार्शी रोडवर स्थलांतर झाल्यापासून शिस्त बिघडून गेली आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन परिसरातील अनागोंदी दूर करून शिस्त लावण्याची गरज अधिकारी व कर्मचारी व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anyone can come here