हिंगोलीत भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विक्रीला प्राधान्य दिले आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतमालाची विक्री करून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. मंगळवारी (ता. दोन) नव्या मोंढ्यात भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक झाली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यांपासून लॉकडाउन, संचारबंदी, जमावंबदी लागू करण्यात आली आहे. यात शेतमाल विक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. मात्र, त्‍यासाठी येत असलेल्या अडचणी पाहता शेतकऱ्यांनी शेतमाला विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानंतर लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाली. 

हळद, हरभरा, गहू विक्रीसाठी

खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती तसेच नवा मोढा येथे आणणे सुरू केले आहे. यात हळद, हरभरा, गहू विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी नव्या मोंढ्यात भुईमुगाच्या चार हजार पोत्यांची आवक झाली. चार हजार ६०० ते पाच हजार शंभर रुपये क्‍विंटलचा भाव मिळत आहे. येथे लिलाव पद्धतीने मालाची खरेदी केली जाते. जिल्‍हाभरातून भुईमूग उत्‍पादक शेतकऱ्यांनी शेंगा विक्रीस आणल्या होत्या.

दोन हजार हेक्‍टरवरील केळी पिकाला फटका

गिरगाव : वसमत तालुक्यातील गिरगाव भागात दोन हजार हेक्टरवरील केळीच्या पिकाला तापमानाचा फटका बसला आहे. त्यामुळे उत्‍पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
गिरगाव परिसरातून इसापूर व येलदरी धरणाचे दोन कालवे जातात. यामुळे या भागातील बहुतांश जमीन सिंचनाखाली आल्याने शेतकरी केळी, ऊस, हळद या नगदी पिकांची लागवड करतात. 

पारा ४३ अंशांपर्यंत वाढला

गिरगावसह परजना, खाजमापूरवाडी, बोरगाव खुर्द, मुरुंबा, सोमठाणा, माळवटा, पार्डी बुद्रुक आदी गावांतील शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात दोन हजार हेक्‍टरवर केळीची लागवड केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती. पारा ४३ अंशांपर्यंत वाढला होता. याचा फटका केळी पिकाला बसला आहे. आधीच लॉकडाडन, संचारबंदीमुळे सर्वत्र बाजार बंद असल्याने केळीला खरेदीदार व्यापारी मिळत नव्हते.

नवीन केळी लागवड

 त्यामुळे चारशे ते पाचशे रुपयांपर्यंतच भाव मिळत होता. मागच्या वर्षी पंधराशे ते सोळाशे रुपये क्‍विंटपर्यंत भाव होता. आता नवीन केळी लागवड केली असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यावर खर्च केला आहे. वाढलेल्या तापमानामुळे पाणे करपून जात असून उत्पादनावर त्‍याचा परिणाम होणार असल्याचे केळी उत्‍पादक सांगत आहेत.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com