येलदरी परिसरात नवरंग पक्षाचे आगमन, पक्षीमित्रांकडून अभ्यासासाठी नोंद

file photo
file photo

परभणी ः औरंगाबाद, नांदेड, लातुर, बीड, जालना व बुलढाणा या जिल्हयातील काही झुडपी जंगले असणाऱ्या  अधिवासात आढळणारा नवरंग पक्षी परभणी - हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी परिसरात आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक तथा अभ्यासक अनिल उरटवाड यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी या पक्षाच्या आगमनाची नोंद केली आहे. या पक्षाची नोंद पक्षी अभ्यासात खूप महत्वपुर्ण मानली जात आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी परिसरात अनेकवेळा वेगवेगळ्या पक्षाची नोंद केली जाते. कधी परदेशी तर कधी देशातंर्गत भटकंती करणारे अनेक पक्षी या परिसरात येत असतात. त्यामुळे येलदरी, नेमगिरी या परिसरात पक्षीमित्रांची नेहमीच वर्दळ असते. या परिसरात पक्षी अभ्यास करणारे अनिल उरटवाड, गणेश कुरा, पुष्पराज मांडवगडे या पक्षीमित्रांनी अनेक पक्षांच्या नोंदी केलेल्या आहेत. शनिवारी (ता. 10) या पक्षीमित्रांना नव्या एका पक्षाची नोंद करता आली आहे. त्याचे नाव आहे नवरंग.  त्याला इंग्रजी भाषेत Indian Pitta असे म्हणतात. तर शास्त्रीय भाषेत त्याला Pitta brachyuran असे संबोधले जाते.

नवरंग उडतांना त्याच्या पंखाच्या टोकावर पांढरे ठिपके दिसतात

नवरंग पक्ष्यामध्ये नर आणि मादी  दिसायला सारखेच असतात. नवरंग पक्षी आकाराने साळुंकी ऐवढा असतो. नवरंगाच्या अंगावर पांढरा, काळा, हिरवा, निळा, पिवळा, लाल, केशरी आदी रंग गडद प्रमाणात दिसुन येतात. भारतातील सर्व झुडपी जंगले, वने या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आढळून येते. नवरंग उडतांना त्याच्या पंखाच्या टोकावर पांढरे ठिपके दिसतात. 'व्हीट – टयु' असा नवरंग आवाज काढतो. नवरंग पक्ष्याचा विणीचा काळ मे ते ऑगस्टच्या दरम्यान असतो. नवरंग संपुर्णपणे किटक भक्षक पक्षी आहे. भारतात स्थानिक स्थलांतर करणारा नवरंग हा पक्षी मे महिन्याच्या सुमारास महाराष्टाला भेट देतो.

परभणी शहरातील कृषी विद्यापीठ परिसरातही नवा पाहूण्यांची नोंद

येलदरी परिसरात अजूनही वेगवेगळ्या पक्षांच्या नोंदी घेण्याचे काम या पक्षीमित्राकडून करण्यात येत असते. यंदा या पक्षीमित्रांनी परभणी शहरातील कृषी विद्यापीठ परिसरातही नवा पाहूण्यांची नोंद केली होती. जिल्ह्यात ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त आहे अश्या ठिकाणी हमखास हे पक्षीमित्र फिरत असतात. त्यांच्या निरीक्षणामुळे जिल्ह्यात नव्याने आलेले पक्ष्यांची माहिती सर्वसामान्या पर्यंत पोहचली जाते. पक्ष्यांची नोंद करून त्याचा अभ्यास करणे व त्यांचा इतर विद्यार्थांना फायदा करून देण्याचे काम हे पक्षीमित्र सातत्याने करत असतात.

मराठवाडयात काही मोजक्याच ठिकाणी आढळतो

मराठवाडयात काही मोजक्याच ठिकाणी आढळतो. औरंगाबाद, नांदेड, लातुर, बीड, जालना, बुलढाणा या जिल्हयातील काही झुडपी जंगले असणाऱ्या अधिवासात तो  दिसल्याच्या नोंदी आहेत. या पाठोपाठ आता परभणी हिंगोली जिल्ह्यात ही नोंद घेण्यात आली आहे. ही नोंद पक्षी अभ्यासात खूप महत्वपुर्ण असणार आहे.

- अनिल उरटवाड, पक्षीमित्र, परभणी

संपादन -प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com