निवडणुकीत भरतात रंग, बिदागीवेळी बेरंग! 

लोककलावंत
लोककलावंत

औरंगाबाद - निवडणुकीत आपली कला सादर करून प्रचारात रंग भरणाऱ्या, नेते, पक्षांचा उदो उदो करणाऱ्या लोककलावंतांच्या मानधन किंवा बिदागीचा प्रश्‍न येतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर बेरंग भाव उमटतात. प्रत्येक निवडणुकीतील लोककलावंतांना ही अनुभूती येत असून, ही उपेक्षा थांबावी, अशी अपेक्षा या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. शिवाय लोककलेला राजाश्रयाची जुनी मागणी प्रलंबित आहेच. 

निवडणुका आल्या, की राजकीय मंडळींना प्रचारासाठी लोककलावंत आठवतात. सभेसाठी जमविलेल्या गर्दीला थोपवून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवितात. त्यानुसार घशाला कोरडपडेपर्यंत शाहीर, गोंधळी, गायक जिवाचे रान करतात अन्‌ जमलेल्या गर्दीला थोपवितात, नेता येईपर्यंत किंवा भाषणे सुरू होईपर्यंत "साहेब', पक्षांचे महत्त्व पटवून देतात. साहेब आले, की मग कलाकाराला आपल्या कलेचे सादरीकरण तातडीने किंबहुना मध्येच थांबवावे लागते.

एकदा का निवडणुकीचे निकाल लागले, की निवडणुकांत रंग भरणाऱ्या लोककलावंतांचे चेहरे बेरंग होण्याची वेळ येते. मानधनप्रश्‍नी लोककलावंतांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाकडून राजाश्रय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा लोककलावंतांकडून व्यक्‍त करण्यात आली.  पूर्वी राजाश्रय, लोकाश्रयात लोककला बहरल्या. आता निवडणुकीच्या काळात लोककलाकारांना मोठी मागणी राहील. काहींच्या तारखा बुक होतात, तर काहींना काम मिळावे, यासाठी चकरा माराव्या लागतात. आधी काम मिळविण्यासाठी, तर नंतर निवडणूक निकालानंतर बिदागी मिळविण्यासाठी चकरा माराव्या लागतात. जमलेल्या गर्दीला सरकारचे, साहेबांचे गुणगान गाण्यासाठी जोवर संयोजक थांबा म्हणत नाहीत, जोवर साहेबांचे आगमन होत नाही तोपर्यंत त्यांना धाप लागली तरी थांबता येत नाही. एकदा का निवडणूक निकाल लागला, "साहेब' निवडून आले तरी चकरा मारूनच बिदागी मिळवावी लागते. "साहेब' पडले तर मग त्यांची भेट होणे दुरापास्त होऊन बसते, किंबहुना बिदागीवर पाणी सोडावे लागते, असे अनुभव काही सांगतात. 
 

महाराष्ट्र ही लोकला, लोककलावंतांची खाण आहे. कुडमुडे जोशी, पांगुळ, भराडी, वासुदेव, भाट, भुत्या, जोगते बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिले आहेत. श्रोत्यांच्या अंगी चैतन्य निर्माण करणारे शाहीर, गोंधळी, भारुडकार निवडणुकीच्या प्रचारासाठी, शासकीय योजनांच्या प्रचार, प्रसारासाठी काम करतात. निवडणुकांमध्ये लोककलाकारांना मानधनासाठी हेलपाटे मारावे लागतात. यामुळे आता काही समजूतदारपणा दाखवीत आधी ऍडव्हान्स घेत आहेत. ऍडव्हान्स घेऊनच प्रचार, प्रसाराची तयारी दाखवावी लागणार आहे. 
- राजू सोनवणे 
 

कलावंताला घर चालविण्यासाठी चार पैसे पदरात पडतील या गरजेपोटी हे करावे लागते. 25 वर्षांपासून मी तीन हजारांहून अधिक पथनाट्ये केली. निवडणुकीचे पथनाट्य करताना फारच दक्ष राहावे लागते, कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ लावला जातो. त्यातून चुकीचा अर्थ निघाला तर अनुचित प्रकारही होऊ शकतात. यासाठी तज्ज्ञांकडून ते तपासून घेऊन पोलिसांची परवानगी घेऊनच सादरीकरण करावे लागते. निवडणुकीच्या काळात उमेदवार प्रचंड व्यस्त असतात. यामुळे शेवटचे सादरीकरण होण्यापूर्वीच पूर्ण बिदागी मिळेल, याची काळजी घेणे चांगले. गेल्या निवडणुकीच्या वेळी काही कलावंतांना 15 दिवस बाहेरगावी जाऊन प्रॅक्‍टिस करून रिकाम्या हाताने परतावे लागले होते. कलाकारांना राजाश्रम मिळाला तर कला आणि
कलावंत जगेल. 
- मदन मिमरोट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com