esakal | प्रेरणादायक! अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएफएस

बोलून बातमी शोधा

Latur News

अशितची स्पर्धा परीक्षा देण्याची जिद्द होती. त्याने अभियंत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी आली होती, मात्र त्याने स्पर्धा परीक्षेलाच प्राधान्य दिल्याने यश मिळाले आहे.

प्रेरणादायक! अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला आयएफएस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (उस्मानाबाद) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेतल्या जाणाऱ्या भारतीय वन सेवा (आयएफएस) परीक्षेत - २०१९ एकुरगा(ता. उमरगा) येथील अशित नामदेव कांबळे याने देशात ६६ वा येण्याचा बहुमान मिळविला आहे. दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी तो अभ्यास करीत होता. आयोगाच्या दुसऱ्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले आहे. 

अशितचे प्राथमिक शिक्षण एकुरगा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गावातीलच शिवशक्ती विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात (अहमदपूर) पूर्ण झाले. बारावीनंतर पदवीसाठी पुणे येथील विश्वकर्मा इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या शिक्षण संस्थेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला व तेथे शिक्षण पूर्ण केले.

तुम्ही एलआयसी पॉलिसी काढली असेल, तर आधी हे वाचा

त्याचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळात उमरगा येथे मेकॅनिक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आई ललिता कांबळे अंगणवाडी सेविका आहे तर विवाहित बहिण अनिता अंबादास डावरे याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. दरम्यान जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या आयोगाच्या परीक्षेत त्याला हे यश मिळाले आहे.

१४ फेब्रुवारीला दिल्ली येथे तोंडी परीक्षेला बोलावण्यात आले होते. त्याचा निकाल बुधवारी (ता.चार) जाहीर करण्यात आला आणि त्यात अशित हा देशातून ६६ वा क्रमांक आला. प्रचंड इच्छाशक्ती आणि आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशितने अपार प्रयत्नातून केलेल्या यशाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. 

मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच

अशितची स्पर्धा परीक्षा देण्याची जिद्द होती. त्याने अभियंत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी आली होती, मात्र त्याने स्पर्धा परीक्षेलाच प्राधान्य दिल्याने यश मिळाले आहे. आमचे त्याला प्रोत्साहन होते. मात्र त्याने घेतलेल्या मेहनतीची ही फलश्रुती आहे. 
- नामदेव कांबळे, वडील 

ग्रामीण भागाच्या मातीत सोनं दडलेलं असत. मात्र त्याला उजाळा, चकाकी देण्यासाठी शिक्षणाचे माध्यम फार उपयुक्त असतं आणि अगदी लहान वयापासून मी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. मागील वर्षी सहा गुणांनी युपीएससीत संधी गेली. मात्र हरलो नाही. शिकण्याचा संघर्ष केला आणि दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. यात स्वतःचे प्रयत्न कामी आलेच त्याचबरोबर आई - वडिल, मार्गदर्शक शिक्षकांचे प्रोत्साहन महत्वाचे ठरले. 
- अशित कांबळे