महामार्गाच्या बाबतीत अशोक चव्हाणांनी दिल्या या सूचना...

अभय कुळकजाईकर
Tuesday, 21 April 2020

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या बारसगाव, भोकर - राहटी मार्गाच्या कामाची गती वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या.

नांदेड - महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या २२२ या राष्ट्रीय महामार्गाचे अर्धापूर तालुक्यातील बारसगावपासून सुरू होणारे व तेलंगणाच्या सीमेवरील रहाटीपर्यंत जात असलेले रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कामाची गती वाढवून तत्काळ काम पूर्ण करावे, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, स्थापत्य, विद्युत, राष्ट्रीय महामार्ग या संदर्भातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकारी व संबंधित कामाचे कंत्राटदार यांच्यासमवेत मंगळवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोेंडगे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - ‘मनरेगा’तंर्गत मागेल त्याला काम - अशोक चव्हाण

संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून बारसगाव-भोकर-रहाटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. या कामावरील ठेकेदार बदलूनसुद्धा कामाला गती मात्र येवू शकली नाही. त्यामुळे नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. या कामावर निधी उपलब्ध असताना सुद्धा काम का रखडले? याचे कारण तत्काळ शोधा व कामाची गती वाढवा. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मंजूर असलेली सर्व कामे सुरू करा
सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची प्रगती व वर्षनिहाय, त्यावर झालेला खर्च व त्यातून रस्त्याची झालेली निर्मिती याचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. ज्या ठिकाणी रस्ते निर्मितीसाठी भूसंपादनाची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी भूसंपादन तत्काळ करून घेण्यात यावे. जी कामे शासनानी मंजूर केली आहेत ती सर्व कामे सुरू करण्यात यावीत. लोहा - कंधार - अंबुलगा - मुखेड - एकलारा - खानापूर - देगलूर या रस्त्याच्या कामाला सुद्धा गती देण्यात यावी, असे आदेश श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

हेही वाचलेच पाहिजे - Video : घरातल्या जगातच दडलीय तुमची आवड, काय म्हणतात डाॅ. नंदकुमार मुलमुले

कंत्राटदारांच्या समस्या घेतल्या जाणून
या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांसह संबंधित कामाच्या कंत्राटदारांना पाचारण करण्यात आले होते. प्रलंबित पडलेल्या कामांसंदर्भात कंत्राटदारांच्या अडीअडचणी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी समजून घेतल्या व कामाची वाढविण्यासाठी या कंत्राटदारांना आदेश दिले. याच बैठकीत विद्युत विभाग व इतर विषयांसंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan's suggestions on the highway ..., Nanded news