‘मनरेगा’तंर्गत मागेल त्याला काम - अशोक चव्हाण 

अभय कुळकजाईकर
Monday, 20 April 2020

राज्यात मनरेगातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात येणार असून उद्योगधंदे व व्यापाराला चालना देण्यासाठी प्राप्तीकरामध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्याचबरोबर केंद्राने महाराष्ट्राला मदत देताना झुकते माप द्यावे, असेही त्यांनी सांगितले आहे. 

नांदेड - कोरोनामुळे लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशांना घरी बसण्याची वेळ आली आहे. याच काळात मागेल त्या मजुराच्या हाताला काम व त्यांना कामाचा योग्य दाम मिळण्यासाठी मनरेगातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उद्योगधंदे व व्यापाराला चालना देण्यासाठी प्राप्तीकर (इन्कमटॅक्स) मध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

नांदेड जिल्हा हा आतापर्यंत तरी सुदैवी ठरला असून जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी आतापर्यंत ८८ वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. यापुढेही जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी नागरिक आणि प्रशासन यांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

हेही वाचा - कोरोनाच्या लढ्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांनी फडकवला नांदेडचा झेंडा...

जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद केल्याने फायदा
नांदेड जिल्ह्याच्या सभोवताली कोरोनाची लागण झाली आहे. याचा प्रसार नांदेड जिल्ह्यात होवू नये म्हणून जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद केल्या आहेत. एका बाजूस हिंगोली, परभणी, लातूर, यवतमाळ या जिल्हा सीमा तर दुसऱ्या बाजूस कर्नाटक आणि तेलंगणा या राज्य सीमा आहेत. या सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे थोडी जास्तच काळजी घेऊन जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करण्याच्या निर्णय घेतला. त्याचाही फायदा जिल्ह्याला झाला असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगीतले.

आर्थिक घडी नीट बसविण्याचा प्रयत्न
एका बाजूस कोरोनाशी लढा देत असताना दुसऱ्या बाजुस विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठी मनरेगातंर्गत मागेल त्याला काम ही योजना सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग आणि व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जरी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. खासगी कर्मचारी व कामगारांना पगार देण्यासाठी व्यवस्थापनाकडे पैसे नाहीत. त्यांचे बँकेचे हप्ते रूकले आहेत. अशावेळी इन्कम टॅक्समध्ये सवलत देणे गरजेचे आहे. त्यासोबतच थकीत हप्त्यांवरील व्याज माफ करावे, याचा पुनरूच्चार श्री.  चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचलेच पाहिजे - जिल्ह्यातील उद्योग असे होणार सुरु

केंद्राने महाराष्ट्राला झुकते माप द्यावे
कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्याचबरोबर लॉकडाउनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राला झुकते माप देत आधिकाधिक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकमंत्री चव्हाण यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask for work under 'MGNREGA' - Ashok Chavan, Nanded news