
ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन नामनिर्देशन दाखल करण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे.
उस्मानाबाद : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन नामनिर्देशन दाखल करण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची कमालीची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. नामनिर्देशन अर्जातील कागदपत्रांची यादी कमी होती की काय? त्यात अजुन निवडणुक खर्चासाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या खाते बंधनकारक करण्यात आले आहे. मागास प्रवर्गात निवडणूक लढविणाऱ्यांच्या तर हाल अजुन वाईट असल्याच्या प्रतिक्रिया गावोगावी ऐकायला मिळत आहेत.
सध्याच्या स्थितीला सेतु केंद्र, विविध दाखले घेण्यासाठी संबधित ठिकाणी यात्रेचे स्वरुप प्राप्त होत आहे. ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन दाखल करावयाचे आहेत. राखीव जागेवर अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची धावपळ होत आहे. अनेक महिला उमेदवारांचे माहेर तालुक्याबाहेरील असल्यामुळे कागद काढण्यासाठी गावपुढारी यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर पडणार असल्याने तर सगळाच गोंधळ वाढला आहे.
आपल्या प्रवर्गाला आरक्षण असते. याची माहिती अगोदर मिळाली तर उभा राहायच की नाही हे निश्चित करता येते. सरपंच होण्यासाठी खरी स्पर्धा असते. पण आता हे निकालानंतर जाहीर होणार असल्याने उत्कंठा अधिक वाढल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण असलेल्या जागेवर अनेक उमेदवारांनी नागरिकांचा संपर्क वाढवला आहे.तर राखीव असलेल्या जागेवर अनेक गावातुन सक्षम पर्याय शोधण्याचा मार्ग सूरु झाला आहे. पण यामध्ये कागदपत्राच्या जुळवाजुळवीसाठी अडचणी येत आहेत.
जातीचे प्रमाणपत्र काढण्यापासुन घरपट्टी, नळपट्टी भरण्यापर्यंत सगळीच प्रक्रिया एकाचवेळी होत आहे. शिवाय उमेदवाराचा निवडणुकीचा खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते काढावे लागणार आहे. आता पासूनच राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते काढण्यासाठी मोठी रांग लागल्याचे दिसुन येत आहे. अर्ज केल्यानंतर साधारण तेवढ्या कालावधीत खात मिळण्याच्या मोठ्या अडचणी असतात. त्यामुळे खर्चाचा तपशील ठेवण्यासाठी नागरी बँकाच्या खात्याचा पर्याय स्विकारला जावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेचे नियम व त्याला लागणारा वेळ यातच उमेदवाराची दमछाक होईल अस दिसत आहे. निवडणुकीची इतर सर्व कागदपत्र काढण्यासाठी लागणारा अवधी व एका खात्यासाठी लागणारा वेळ सारखाच असेल त्यामुळे एकावेळी उमेदवारांनी नेमके करायचे तरी काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
संपादन - गणेश पिटेकर