मतदार वाढले, पण मतदान घटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

जालना : वर्ष 2014 मध्ये 69.33 टक्‍के, यंदा 67 इतकी टक्केवारी 

जालना - जिल्ह्यातील पाचही विधानसभेसाठी सोमवारी (ता. 21) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 67.07 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून मंगळवारी (ता. 22) जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी निवडणूक विभागाला तब्बल वीस तासांचा अवधी लागला आहे. विशेष म्हणजे वर्ष 2014 च्या निवडणुकीची टक्‍केवारी 69.33 इतकी होती, यंदा ही टक्‍केवारी 67.07 इतकी आहे. अर्थात, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या मात्र वाढलेली आहे. 

जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण 79 उमेदवारांचे सोमवारी (ता.21) ईव्हीएम मशीनमध्ये भविष्य बंद झाले आहे. जिल्ह्यात पाच विधानसभेसाठी जिल्ह्यातील एकूण 15 लाख 55 हजार 753 मतदारांपैकी 10 लाख 43 हजार 403 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 67.07 टक्के मतदान झाले आहे. यात जालना विधानसभेत 55.58 टक्के, परतूर विधानसभेत 68.34 टक्के, घनसावंगी विधानसभेत 73.23 टक्के, बदनापूर विधानसभेत 68.73 टक्के, भोकरदन विधानसभेत 70.59 टक्के मतदान झाले आहे. 
 
गेल्या निवडणुकीतील टक्‍केवारी 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण 69.33 टक्के एवढे मतदान झाले होते. यामध्ये परतूरमध्ये 70.03 टक्के, घनसावंगीत 75.35 टक्के, जालना मतदारसंघात 60.10, बदनापूरला 67.69, तर भोकरदन विधानसभा मतदारसंघात 74.07 टक्के मतदान झाले होते. एकूण 9 लाख 62 हजार 951 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 5 लाख 23 हजार 579 पुरुष, तर 4 लाख 39 हजार 372 महिला मतदार होते.    

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly elections