सहायक प्रकल्प अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना पकडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

उस्मानाबाद - उमरगा नगरपरिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी मारुती एकनाथ भादुले यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करून पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी श्री. भादुले यांनी ही लाच स्वीकारली. 

पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 16 जुलै 2016 रोजी उमरगा नगरपरिषदेमध्ये अर्ज जमा केल्यानंतर संबंधित अर्जदाराने सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. अर्जदाराने भादुले यांना भेटून घरकुलाच्या मंजुरीबाबत विचारणा केली. मात्र घरकुल मंजूर करवून देण्यासाठी व पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी अर्जदाराकडे श्री. भादुले यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. संबंधित अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे यासंदर्भात तक्रार नोंदविल्यानंतर गुरुवारी या पथकाने सापळा रचून श्री. भादुले यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या पथकात पोलिस निरीक्षक असिफ शेख, बाळासाहेब आघाव, पांडुरंग डंबरे, बालाजी तोडकर, नितीन सूरवसे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल नाईकवाडी व चालक धनंजय म्हेत्रे यांचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

मजुराकडून लाच 
संबंधित तक्रारदार हा दररोज रोजंदारीवर जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. एका मजुराकडून घरकुल मंजुरीसाठी लाच घेण्याचा प्रकार उमरग्यामध्ये घडल्याने नागरिकांतूनही संताप व्यक्त होत आहे. शिवाय नगरपालिकेमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

Web Title: Assistant project officer caught accepting bribe