सायरन वाजला अन्‌ चोरट्यांनी ठोकली धूम! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

आष्टी - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या खडकत येथील शाखेचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, तिजोरी असलेल्या खोलीचे दार उघडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सायरन जोरात वाजू लागल्याने चोरट्यांना तेथून पळ काढावा लागल्याने तिजोरीतील लाखोंचा ऐवज सुरक्षित राहिला. सीसीटीव्ही फुटेजवरून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शनिवारी (ता. 24) सायंकाळी बॅंकेतील कामकाज संपल्यानंतर कर्मचारी नेहमीप्रमाणे घरी निघून गेले. रविवारी (ता. 25) पहाटे साडेतीनच्या सुमारास विनाक्रमांकाच्या जीपमधून आलेल्या चोरट्यांनी बॅंकेच्या शटर चॅनल गेटचे सायरन कनेक्‍शन व कुलूप तोडून आत प्रवेश केला. रोखपाल व व्यवस्थापकाच्या टेबलाच्या ड्रॉवरचे कुलूप तोडून आतील साहित्य विसकटले. त्यानंतर तिजोरी असलेल्या खोलीचे दार उघडताच सायरन जोराने वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. 

पहाटे नमाजसाठी उठलेल्या काही मुस्लिम बांधवांना सायरनचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी बॅंकेच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. बॅंकेमध्ये मजुरी काम करणारे बबन जेवे यांनी मुख्य रोखपाल गणेश शिंदे यांना दूरध्वनीवरून हा प्रकार कळवला, काही वेळाने पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तिजोरीतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य रोखपाल शिंदे व पोलिस उपनिरीक्षक गणेश गोडसे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर तीन वाजून 26 मिनिटांनी 25 ते 30 वयोगटातील तीन चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश केल्याचे व तीन वाजून 32 मिनिटांनी सायरन वाजल्याने तेथून धूम ठोकल्याचे दिसले. 

Web Title: asti news bank theft Central Bank of India