संजय फतेलष्कर यांच्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

औरंगाबाद - विद्यापीठ परिसरात व्यायाम करून परतताना वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी संजय फतेलष्कर (रा. बेगमपुरा) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर तलवारीने वार करून मारेकरी पसार झाले. ही गंभीर घटना रविवारी (ता. सहा) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक दोनच्या परिसरात घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेलष्कर (रा. बेगमपुरा) हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विद्यापीठातील गोगाबाबा टेकडी येथे व्यायाम करून विद्यापीठ परिसरात वसतिगृह क्रमांक दोनच्या परिसरात जात होते. त्यावेळी वाहनातून आलेल्या पाच जणांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर मागून तलवारीने वार केला. त्यांच्या डोळ्यांत मिरचीची भुकटी फेकली. पुन्हा तलवारीने त्यांच्यावर हल्ला चढवून मारेकरी पसार झाले. परिसरात व्यायाम करणाऱ्या काही मल्लांनी फतेलष्कर यांना घाटीत दाखल केले. फतेलष्कर भाजप कामगार सेलचे जिल्हा सरचिटणीस असून, त्यांच्या घाटीत प्राथोमचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

बेगमपुऱ्यातील जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी फतेलष्कर यांचा जवाब घेतला असता मयुर भास्कर आडुळे, चंद्रकांत कैलास गायकवाड, संदीप खरात आणि बाळू संदीप पठारे यांनी हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी पार्श्वभूमी 
फतेलष्कर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच आहे. एका गुन्ह्यात शिक्षा होऊन हर्सूल कारागृहात त्यांना प्रदीर्घ मुक्काम पडला. त्यानंतर सुटून आल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. वर्ष २०१० मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर त्यांनी हल्ला केल्याचा आरोपही आहे, असे सूत्रांनी सांगितले.

फतेलष्कर यांच्यावरील हल्लाप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाला असून, हल्लेखोर बेगमपुऱ्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेच्या अनुषंगाने पुरावे गोळा करीत आहोत. 
- विनायक ढाकणे, पोलिस उपायुक्त. 

Web Title: attack on sanjay fatelakshar crime