कर्ज घेऊन शिकले अन्‌ पहिल्या प्रयत्नात न्यायाधीश बनले 

दत्ता देशमुख
Tuesday, 24 December 2019

बीड जिल्ह्यातील कडा येथील अतुल जोशी यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी वेगळी वाट निवडत यशाला गवसणी घातली. अपयशाने खचणारे आणि परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्यांसाठी अतुल जोशींचे उदाहरण दिशादर्शक आहे. 

बीड - दहावी, बारावीला उत्तम गुण मिळूनही अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नाही. मात्र, त्यानंतर पदवी विज्ञान आणि कायद्याची पदवी आणि कर्ज घेऊन पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या कडा (ता. आष्टी) येथील अतुल जोशी यांनी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे या काळात त्यांनी पुणे येथे वकिली आणि महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. अपयशाने खचणारे आणि परिस्थितीचे रडगाणे गाणाऱ्यांसाठी अतुल जोशीचे उदाहरण दिशादर्शक आहे. 

कडा येथील अतुल जोशी यांच्या घरची परिस्थिती मध्यमवर्गीय. वडिल रत्नाकर जोशी हे महावितरणमधून लाईनमन म्हणून सेवानिवृत्त झालेले तर मोठा भाऊ पुण्यात अभियंता आहे. अतुल कुटूंबात धाकटे आहेत. गावातच दहावी, 12 वी शिक्षण घेणाऱ्या अतुल जोशींना अभियंता व्हायचे होते. परंतु, त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अहमदनगर येथे विज्ञान पदवीला प्रवेश घेतला.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

विशेष म्हणजे विषयाची गोडी नसतानाही नाईलाजाने पदवी पूर्ण केली. पुढे पुण्यात नोकरीला असलेल्या भावाने पाठबळ दिले आणि प्रवेशपूर्व परीक्षेत अतुलने आपली क्षमता आणि हुशारी दाखविल्याने प्रतिथयश फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांना एलएलबीला प्रवेश मिळाला. त्यांनी सुवर्णपदकासह वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुढे बंगळुरू येथील विधी विश्व विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी मिळविली. बंगळूरु येथे शिकण्यासाठी त्यांना एका बॅंकेचे शैक्षणिक कर्ज घ्यावे लागले. 

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

वकील, प्राध्यापक ते न्यायाधीश 
कायद्याची पदव्युत्तर पदवी (एलएलएम) मिळविल्यानंतर त्यांनी प्राध्यापकपदासाठी आवश्‍यक असणाऱ्या नेट, सेट या दोन्ही परीक्षांतही यश मिळविले. तीन वर्षे वकिली आणि शिक्षण घेतलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातच तीन वर्षे कायद्याचे प्राध्यापक म्हणूनही सेवा केली. याच काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही केला. 2019 मध्ये झालेल्या न्यायाधीशपदाची पूर्व आणि मुख्य परीक्षांसह मौखिक परीक्षेत यश मिळविले आणि 51 व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

"सकाळ'चा असाही झाला फायदा 
पुण्यात अभ्यास करताना अतुल जोशी ऑनलाईन "सकाळ' वाचत असत. त्यांना मौखिक परीक्षेत बीडमधील मुख्य समस्या कोणती असा प्रश्न विचारला गेला. त्यांनी "सकाळ'च्या बीड आवृत्तीमध्ये बातम्यांमधून प्रसिद्ध झालेले ऊसतोड कामगारांचे प्रश्‍न आणि त्यांच्या समस्या व उपाय वाचले होते. त्याचाच त्यांना फायदा झाल्याचे अतुल जोशींनी सांगितले. 

 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रमाबरोबरच जुन्या प्रश्‍नपत्रिकांचाही सराव महत्त्वाचा आहे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. मुलाखतीच्या दृष्टीने चालू घडामोडींचा अभ्यास आणि व्यक्तिमत्व विकासावर भर देणे गरजेचे आहे. परिस्थितीबद्दल रडगाणे गाण्यापेक्षा त्यावर मात केली तर यश हमखास मिळते. 
-अतुल जोशी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul Joshi became a judge on the first attempt