मराठवाडा पदवीधरसाठी ५३.३० टक्के मतदान

ई सकाळ टीम
Tuesday, 1 December 2020

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.एक) सकाळ आठपासून मतदानाला सुरवात झाली आहे.

औरंगाबाद :  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी मंगळवारी (ता. एक ) होत असलेल्या मतदानासाठी दुपारी चार वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले. सकाळी पहिल्या दोन तासात ७.६३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ पर्यंत त्यात वाढ होऊन ते २०.७३ टक्के इतके झाले, दुपारी २ वाजेपर्यंत ३७.०८ टक्के मतदान झाले तर ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ इतके मतदार आहेत त्यापैकी दुपारी ४ वाजेपर्यंत १ लाख ९८ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

सर्वाधिक मतदान परभणी जिल्ह्यात ५८.६३ टक्के मतदान झाले तर त्याखालोखाल जालना जिल्ह्यात ५५.७९ टक्के मतदान झाले. बीड जिल्ह्यात ५२.५० टक्के , औरंगाबाद ५२.९८, हिंगोली ५२.९३, नांदेड ५५.३०, लातुर ४५.७० , उस्मानाबाद जिल्ह्यात ५४.९६ टक्के मतदान झाले होते. सकाळी पहिल्या दोन तासात मतदान संथ सुरू होते मात्र दहा वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. १२ वाजेपर्यंत २०.७३ टक्के मतदान होते. त्यात दुपारी २ वाजेपर्यंत १६.३५ टक्के वाढ होऊन ३७.०८ टक्केवारी झाली होती. ४ वाजेपर्यंत पुन्हा १६.२२ टक्के वाढ झाली.

० दुपारी ४ वाजेपर्यंत झालेले जिल्हानिहाय मतदान
औरंगाबाद - ५६३६२
जालना - १६६०७
परभणी - १९१८१
हिंगोली - ८८७४
नांदेड - २७२५७
लातूर - १८८२५
उस्मानाबाद - १८४८३
बीड - ३३३०७
.
० दुपारी ४ वाजेपर्यंत झालेले मतदान
पुरूष मतदान : १,६२,३१४
महिला मतदान : ३६,५८०
इतर : ०२

गेल्यावेळी चव्हाणांचा १५ हजारांनी विजय
यापुर्वी २०१४ मध्ये ३ लाख ६८ हजार ३८५ मतदार होते, त्यापैकी १ लाख ४१ हजार मतदान झाले होते. त्यापैकी १ लाख २९ हजार २१ मते वैध ठरली होती. उमेदवारांची संख्या २३ होती. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण यांना ६८ हजार ७६५ मते मिळाली होती तर शिरिष बोराळकर यांना ५३ हजार ५११ मते मिळली होती. १५ हजार ११८ मतांनी श्री. चव्हाण विजयी झाले होते. 

Live अपडेट्स

- दुपारी चार वाजेपर्यंत मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये ५३.३० टक्के मतदान झाले. एक लाख ९८ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

- दुपारी २ वाजेपर्यंत ३७.०८ टक्के मतदान झाले आहे.
- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गाढेपिंपळगाव येथे दुपारी एक वाजता मतदान केले.
- दुपारपर्यंत २०.७३ टक्के मतदान
- ९१ वर्षांच्या स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा यांनी कोणाच्याही आधाराशिवाय शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालयात मतदान केले.
- गेल्या दोन तासांत मराठवाड्यात ७.६३ मतदान झाले आहे.
- औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शासकीय ज्ञान व विज्ञान महाविद्यालयात मतदान केले.

- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी आजारी असतानाही मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.
- आमदार तथा शिवसेने जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, भाजपचे राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी मतदाने केले.
- तत्पूर्वी मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांनी पत्नीसह औरंगाबाद येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतदानाचा हक्क बजावला.
- माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auangabad Graduate Constituency Election Live Update