जिल्ह्यात ३१ रेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया होणार ई-लिलाव पध्दतीने

राजेश दारव्हेकर 
Thursday, 7 January 2021

जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने रेती घाटांचा लिलाव गतवर्षी होऊ शकला नाही.

हिंगोली :  जिल्ह्यातील अनेक रेती घाटांचे गतवर्षी लिलाव रखडले होते . परिणामी अवैध रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना प्रशासनाकडून अनेक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. अखेर जिल्ह्यातील ३१ रेती घाटाच्या लिलावाला मुहूर्त मिळाला असून ही प्रक्रिया ई-निविदा व ई आँक्शन या दोन्ही प्रक्रियेद्वारे राबविली जाणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने रेती घाटांचा लिलाव गतवर्षी होऊ शकला नाही. परिणामी अनेक रेती तस्करांनी अवैधरित्या रेतीचा उपसा सुरूच ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी यांच्यासह तहसीलदारांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात रेती तस्कराची वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तरी देखील रेती तस्करीवर आळा येत नव्हता. पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील ३१ रेती घाटांच्या लिलावाला मान्यता दिली.

मराठवाड्याचा बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

या निमित्त २०२०-२१ अंतर्गत वाळूचा लिलाव करण्याकरीता ई - निविदा व ई - ऑक्शन या दोन्ही प्रक्रियाद्वारे राबविली जाणार आहे. दोन जानेवारीला निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. १४ जानेवारीपर्यंत ऑनलाईन निविदा भरणे, सादर करणे, तांत्रिक व व्यापारी अंतिम करण्याकरीता दुपारी एक वाजेपर्यंत मुभा दिली आहे. १५ जानेवारीला ई - निविदेतील तांत्रिक लिफाफे उघडले जाणार असून १८ जानेवारीला दुपारी ई - लिलाव होणार आहे . 

यामध्ये कयाधू नदीवरील हिंगोली तालुक्यातील हिंगणी, कळमनुरी तालुक्यातील चाफनाथ, नांदापूर, सोडेगाव, सावंगी भुतनर, सालेगाव, कोंढुर, डिग्रस तर्फे कोंढुर, डोंगरगावपूल, सापळी, शेवाळा, येगाव, पिंपरी बुद्रुक, कस्बेधावंडा, कान्हेगाव, चिखली, पूर्णा नदीवरील औंढा नागनाथ तालुक्यातील भगवा, टाकळगव्हाण, नांदखोडा, अंजनवाडी, नालेगाव, आजरसोंडा,तपावेन, माथा, अनखळी, पोटा बुद्रुक वसमत तालुक्यातील पूर्णा नदीवरील माटेगाव, ढऊळगाव, सावंगी बुद्रुक, परळी दशरथे, ब्राम्हणगाव या ३१ ठिकाणच्या रेतीघाटांचा समावेश आहे .
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The auction of 31 sand ghats in hingoli district will be conducted through both e tender and e action