‘ऑल आऊट’मध्ये शहरात झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

औरंगाबाद - पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये शहरात अनेकांची झाडाझडती घेतली. यावेळी विविध गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या, बेशिस्त वाहनधारकांवर धडक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

औरंगाबाद - पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनमध्ये शहरात अनेकांची झाडाझडती घेतली. यावेळी विविध गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या, बेशिस्त वाहनधारकांवर धडक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये विविध गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश येत आहे. रविवारी (ता. २५) आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रमुख चौकांमध्ये ८५ पोलिस अधिकारी व ४६२ कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने थांबवून तपासणी करण्यात आली. परवाना नसणे, सीटबेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, वाहनांची कागदपत्रे नसणे, चित्रविचित्र नंबर प्लेट, ओव्हरसीट अशी विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. या काळात पोलिसांनी एक हजार ११३ वाहनांची तपासणी करून ३६९ केसेस करत दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर अवैध दारूविक्री करणाऱ्या सात जणांना अटक करुन, त्यांच्याकडून एक लाख रुपयांची बेकायदा दारू जप्त करण्यात आली. मोबाईलचोर शिवाजी नंदू नांगरे (रा. सलामपूर नगर, पंढरपूर) याला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीचा आठ हजार रुपये किमती मोबाईल जप्त केला. तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हद्दपार गुन्हेगार शेख रफीक ऊर्फ व्हाईटनर शेख युसूफ (रा. चिश्‍तिया कॉलनी) याला अटक केली. याशिवाय मोबाईल चोरणाऱ्या विश्‍वजित जाधव व एका अल्पवयीन मुलाला अटक करून त्याच्या ताब्यातील वीस हजार रुपयांचा मोबाईल जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्‍वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. 

Web Title: auraangabad marathwada news all out operation in aurangabad