वनविभागाच्या कार्यक्रमात सर्पमित्रालाच कोब्राचा दंश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विषारी-बिनविषारी सापांची माहिती देणाऱ्या डॉ. किशोर पाठक यांनाच नागाने दंश केला. ही घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळच्या सुमारास घडली. डॉ. पाठक यांना खासगी रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

औरंगाबाद - वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विषारी-बिनविषारी सापांची माहिती देणाऱ्या डॉ. किशोर पाठक यांनाच नागाने दंश केला. ही घटना शनिवारी (ता. सात) सायंकाळच्या सुमारास घडली. डॉ. पाठक यांना खासगी रुग्णालयात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे.

प्रादेशिक वन विभागात वन्यजीव सप्ताहानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी या सप्ताहाचा समारोप होणार होता. त्यानिमित्त सापांबद्दल माहिती देण्यासाठी डॉ. किशोर पाठक यांनी विषारी आणि बिनविषारी साप सोबत आणले. प्रादेशिक उपवनसंरक्षक सतीश वडस्कर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अगोदर रोपवाटिकेत आयोजित केलेला हा कार्यक्रम पावसामुळे कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या सभागृहात सुरू होता.

प्रात्यक्षिकासह साप कसे हाताळावेत, याची माहिती देत असतानाच ते हाताळत असलेल्या नागाने त्यांना दंश केला. त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ प्रथमोपचार करून जवळच्याच हायटेक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रात्री प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे त्यांना अतीवदक्षता विभागात हलवण्यात आले. दरम्यान, सर्पमित्र असलेले डॉ. पाठक हे पकडलेले साप गौताळा अभयारण्यात सोडण्यापूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी आले होते. त्यावेळी सुरू असलेल्या कार्यक्रमात माहिती देताना हा अपघात झाल्याचा खुलासा विभागातील अधिकाऱ्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच अनेक पक्षी-प्राणीमित्रांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, सहायक वनसंरक्षक अर्जुन सोनवणे आणि काही कर्मचारी उशिरापर्यंत रुग्णालयात तळ ठोकून होते.

Web Title: auraangabad marathwada news snake bite