देवळाईतील म्हाडा प्रकल्पाला पाण्याची प्रतीक्षा

प्रकाश बनकर
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

-एमआयडीसीने काढलेले टेंडर मंजुरीसाठी मुंबई कार्यालयात 

-म्हाडाने एमआयडीसीला दिले 1 कोटी 75 लाख रुपये

औरंगाबाद : देवळाई येथील म्हाडाच्या नव्या 450 आणि जुन्या 600 सदनिकांतील रहिवाशांसाठी दोन कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. याविषयी म्हाडाने एमआयडीसीला 1 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने टेंडर काढले; मात्र ते अंतिम मंजुरीसाठी म्हाडाच्या मुंबई कार्यालयात गेले असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे. 

 

म्हाडातर्फे देवळाई, तीसगाव, वाळूज, पैठण येथील 917 सदनिकांची ऑनलाइन पद्धतीने जून महिन्यात सोडवणूक झाली होती. यात देवळाईच्या प्रकल्पाचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांची घोषणा केली होती. या दोन कोटी रुपयांतून देवळाई येथील म्हाडाच्या सदनिकेतील पाण्याचा प्रश्‍न मिटवण्यासाठी नळयोजना राबविण्यात येणार आहे.

एक हजार 50 सदनिकांसाठी ही योजना सामंत यांनी तत्काळ मंजूर केली होती. त्यानंतर म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी याविषयीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार म्हाडातर्फे 1 कोटी 75 लाख रुपये एमआयडीसीकडे देण्यात आले असून, एमआयडीसीने या योजनेसाठी टेंडर काढले आहेत आणि हे टेंडर मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री. शिंदे यांनी दिली.

मंजुरीनंतर सुरू होईल तत्काळ काम 
देवळाईच्या नळयोजनेसाठी टेंडर निघाले आहे; मात्र सत्तास्थापनेच्या पेचामुळे टेंडर मंजुरीच्या हालचाली ठप्प झाल्या आहेत. सत्तास्थापनेचा पेच सुटल्यानंतर कदाचित हे काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AURANAGABD Mhada Project Await Water Supply