पूर्ण बरी होऊ शकतात स्वमग्न मुले!

योगेश पायघन
सोमवार, 2 एप्रिल 2018

औरंगाबाद - मेंदूतील दोषामुळे लहान मुलांच्यात स्वमग्नता (ऑटिझम) ही व्याधी जडते. त्यामुळे त्यांना संवेदना नसतात. नवजात किंवा अवघ्या काही महिन्यांच्या मुलांनाही हा आजार होऊ शकतो; मात्र याचा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो. तारे जमीं पर, बर्फी या चित्रपटांमधून जागृतीचा प्रयत्न झाला; मात्र अजूनही पुरेशी जनजागृती नसल्याने १०० पैकी केवळ १५ मुलेच योग्य उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद - मेंदूतील दोषामुळे लहान मुलांच्यात स्वमग्नता (ऑटिझम) ही व्याधी जडते. त्यामुळे त्यांना संवेदना नसतात. नवजात किंवा अवघ्या काही महिन्यांच्या मुलांनाही हा आजार होऊ शकतो; मात्र याचा बुद्धिमत्तेशी संबंध नसतो. तारे जमीं पर, बर्फी या चित्रपटांमधून जागृतीचा प्रयत्न झाला; मात्र अजूनही पुरेशी जनजागृती नसल्याने १०० पैकी केवळ १५ मुलेच योग्य उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ पासून २ एप्रिल हा दिवस ‘जागतिक स्वमग्नता दिन’ (वर्ल्ड ऑटिझम डे) घोषित केला. स्वत:तच रमून राहण्याच्या तीव्र स्वाभाविक वृत्तीला ऑटिझम किंवा स्वमग्नता म्हणतात. लहान मुलांमध्ये अडीच ते पाच या वयोगटात याचे जास्त प्रमाण आढळते. साधारण तीन ते पाच टक्के ऑटिझमचे प्रमाण आहे. वाढत्या वयात दिसून येणारी ही वृत्ती आजारापेक्षा त्रास देणारी समस्या बनते. यासाठी वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ देतात. 

आत्मकेंद्रीपणाची लक्षणे 
सतत टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईलशी खेळत राहणे, एकाग्र नसणे, अनेक तास एकाच जागेवर राहणे, एकच कृती करणे, खेळण्यांशी बिलगून असणे, वेळी-अवेळी किंचाळणे, शब्दांची फोड करून बोलणे, दुसऱ्याच्या बोलण्याची पुनरावृत्ती करणे, नजरेला नजर न देणे, पाणी खेळायला आवडणे, पाण्याशिवाय इतर वस्तू किंवा रंग पाहिल्यास अस्वस्थ होणे, आपले-परके न समजणे, नवीन कपडे, वस्तू किंवा जागेसोबत जुळवून न घेणे, कोणत्याही धोक्‍याची भीती नसणे.

मुलांशी सौजन्याने वागा
ऑक्‍युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, म्युझिक थेरपी, प्ले थेरपी, रेमेडियल शिक्षण, पालकांचे समुपदेशन, सेन्सरी इन्ट्रिग्रेशन थेरपी, बुद्‌ध्यांक चाचण्या अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतींद्वारे ऑटिस्टिक बालकांचा मानसिक विकास साधता येणे शक्‍य आहे. नियमित थेरपींद्वारे उपचार केले, तर आठ ते दहा महिन्यांत ही व्याधी हळूहळू कमी होऊन ती मुले इतर मुलांप्रमाणेच सर्वसामान्य वागू लागतात; मात्र त्यासाठी पालकांनी अगोदर मुलांशी सौजन्याने वागणे गरजेचे आहे. 

आत्मकेंद्री मुलांची बुद्धिमत्ता सर्वसामान्य मुलांसारखीच असते. त्यामुळे त्यांचा जास्तीत-जास्त वेळ इतर मुलांसोबत आणि घरी येणाऱ्या परिवारातील सदस्यांच्या सहवासात घालवणे गरजे आहे. टीव्ही, मोबाईल, संगणक बंद करून या मुलांना समाजकेंद्री करण्यावर भर देतानाच मानसोपचारतज्ज्ञ व डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आवश्‍यक थेरपी दिल्यास ही मुलेही सामान्य होतात. 
- डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ. 

पाश्‍चिमात्य देशांतून अनेक प्रशिक्षित स्वमग्न मुले वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये कार्य करीत आहेत. एखाद्याने संगणकामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले, तर तो प्रोग्रॅमर किंवा संगणकतज्ज्ञ बनू शकतो. तासन्‌तास एखादी गोष्ट करण्याची चिकाटी या मुलांपाशी असते. वादन, जिम्नॅस्टिक, गिर्यारोहण, फोटोग्राफी, ब्लॉकप्रिंटिग, हस्तकलेच्या वस्तू बनविणे, असे अनेक उद्योग या मुलांना स्वावलंबी बनवतील.
- अंबिका टाकळकर, संचालक, आरंभ ऑटिझम सेंटर.

स्वमग्न मुलांशी सतत बोलत राहणे, त्यांना बोलते करणे, माहिती देत राहणे कुटुंबीयांनी केलेच पाहिजे. ते नव्या स्पर्शाला घाबरतात. त्याची काळजी घेऊन वेगवेगळ्या गोष्टी हाताळायला मदत करावी. त्यांच्यावर चिडचिड न करता शास्त्रीय उपचार वेळीच केल्यास ते सामान्य होऊ शकतात. 
- सुचिता कुलकर्णी, ऑडियॉलॉजी व स्पीच थेरपिस्ट.

Web Title: aurangaabad marathwada news Selfishness child