धार्मिक स्थळांच्या पाडापाडीचा सस्पेन्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

दोन दिवस उलटले, प्रशासनाची तयारी सुरूच; महापौरांनीही घेतला आढावा

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील ११०१ धार्मिक स्थळांवर हातोडा मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे; मात्र कारवाईबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. चार पथकांतील अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (ता. २७) नियुक्‍त्या करण्यात आल्या. दरम्यान, महापौर भगवान घडामोडे यांनीसुद्धा आढावा घेतला. दिवसभर प्रशासनाच्या बैठकांचे सत्र सुरू होते, कारवाई केव्हा होणार याबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे.  

शहरातील धार्मिक स्थळांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांच्या बैठकांचे सत्र गेली चार दिवस सुरू होते. त्यानंतर बुधवारपासून (ता. २६) ११०१ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी जाहीर केले होते; मात्र बुधवारी ते प्रशासकीय कामासाठी मुंबईला गेल्याने कारवाई टळली. आज गुरुवारी (ता. २७) आयुक्त शहरात दाखल झाले. त्यानंतर धार्मिक स्थळांच्या कारवाईबाबत पुन्हा चर्चेला सुरवात झाली. मात्र, दिवसभर एकाही ठिकाणी कारवाई झाली नाही.

कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील प्रमुख वगळता इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या गुरुवारी करण्यात आल्या. महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याचा या पथकात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, महापौर भगवान घडामोडे यांनीसुद्धा दुपारी आयुक्तांसोबत बैठक घेऊन कारवाईबाबत माहिती घेतली. 

पदाधिकारी अनभिज्ञ 
धार्मिक स्थळांच्या विषय गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त बनला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आल्याचा आक्षेप घेत पहिली यादी सर्वसाधारण सभेत रद्द करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने शहरातील हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असली तरी प्रशासनाकडून अद्याप पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापौर भगवान घेडामोडे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा प्रत्येकालाच मान राखावा लागणार आहे, मात्र आम्हालादेखील प्रशासन काय कारवाई करणार आहे, याची माहिती मिळणे आवश्‍यक आहे, असे भगवान घडामोडे म्हणाले.

महापौर विसरले प्रोटोकॉल 
धार्मिक स्थळांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापौर भगवान घडामोडे प्रॉटोकॉल विसरून आयुक्तांच्या दालनात गेले. महापौर कार्यालयातून दुपारी आयुक्तांना तीन-चार वेळा फोन करण्यात आले; मात्र आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू असल्यामुळे त्यांना येण्यास विलंब झाला. त्यानंतर स्वतः महापौर आयुक्तांच्या दालनात गेले. दोघांत दालनात चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने आयुक्त महापौरांच्या दालनात आले. धार्मिक स्थळांचा विषय जनतेसाठी महत्त्वाचा असून, जनतेसाठी मी प्रोटोकॉल विसरून आयुक्तांच्या दालनात गेलो होतो, असे भगवान घेडामोडे पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले.

Web Title: aurangabaad marathwada news Suspension of the pavement of religious places