तुम्हाला तर जागेवरच निलंबित करायला हवं, पण.... 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 11 डिसेंबर 2019

आयुक्तांची शहरातील पाहणी सुरूच राहणार असून, मंगळवारी ते पायी फिरले. मात्र, बुधवारपासून (ता. 11) ते वॉर्डात दुचाकीवरून फिरणार आहेत. वॉर्ड अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे अशी सूचना त्यांनी केली आहे. 

औरंगाबाद- महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता.दहा) आरेफ कॉलनी भागात तब्बल सव्वादोन तास पायी फिरून पाहणी केली. सर्रासपणे सुरू असलेली बेकायदा बांधकामे, रस्त्यावर जागोजागी पडलेला कचरा पाहून आयुक्त चांगलेच भडकले. आरेफ कॉलनीमध्ये तर बेकायदा बांधकामे पाहून अधिकाऱ्यांना खरे तर तुम्हाला जागेवरच निलंबित करायला पाहिजे होते; पण आज पहिला दिवस असल्यामुळे करत नाही, तुमचे तोंड पाहण्यासाठी मी इथे आलो नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावत बेकायदा बांधकामांवर कारवाई करा असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. 

महापालिकेचे आयुक्त म्हणून अस्तिक कुमार पांडेय यांनी सोमवारी (ता. नउ ) पदभार स्वीकारला. पहिल्या दिवशीच त्यांनी प्लॅस्टिक वापरणाऱ्या महापालिका अधिकाऱ्याला जागेवरच चक्‍क 5 हजार रुपये दंड आकारून खळबळ उडवून दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.दहा) सकाळी आठ वाजता ते थेट प्रभाग एकमध्ये पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले. टाऊन हॉलपासून त्यांनी पाहणीला सुरवात केली. पुढे आरेफ कॉलनीत आयुक्त पोचताच त्यांना मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बेकायदा बांधकामे त्यांच्या नजरेस पडली.

हेही वाचा : आयुक्‍तांच्या स्वागताला जाताय तर जरा जपुनच..अन्यथा लागू शकतो दंड 

आयुक्तांनी या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे का? अशी विचारणा सोबत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता बांधकामे सुरू असल्याचे सांगितले. तसेच जागोजागी कचऱ्याचे ढीग आढळून आले. त्यावर आयुक्तांनी या भागात स्वच्छता का होत नाही असा प्रश्‍न केला. मात्र, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. रस्त्यावर पडलेला कचरा उचलून घ्यावा, ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, तिथे डस्टबिन ठेवा. त्यानंतरही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत असतील तर त्यांच्याकडून जागेवर दंड करावा अशी सूचना आयुक्तांनी केली. यावेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक नगररचना आर. एस. महाजन, करनिर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. ख्वाजा, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे यांची उपस्थिती होती. 

नीचे दुकान, उपर मकान

आरेफ कॉलनीत एका ठिकाणी टोलेजंग इमारतीचे काम सुरू होते. या इमारतीलादेखील कर लागला नसल्याचे पाहून आयुक्त अचंबित झाले. इमारतीमध्ये खाली दुकान वर घर होते. हा प्रकार पाहून इमारतीला व्यावसायिक करआकारणी करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पाहणीसाठी आयुक्त लवकर व अधिकारी उशिराने आले. त्यानंतर आरेफ कॉलनीत सावळा गोंधळ पाहून आयुक्त संतप्त झाले. वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांची त्यांनी खरडपट्टी काढली. तुम्हाला जागेवरच निलंबित करायला पाहिजे होते; पण आज पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला निलंबित करत नाही, तुमचे तोंड पाहण्यासाठी मी इथे आलो नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. 

क्‍लिक करा : social _news इथे मिळतात दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय 

दोन दिवसात नदी स्वच्छ करा 

आयुक्तांनी खाम नदीची पाहणी केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे व कचरा आयुक्तांना आढळून आला. त्यामुळे आयुक्त संतप्त झाले. नदीपात्रात अतिक्रमण होताना कारवाई करता आली नाही का? असा प्रश्न करून त्यांनी नदीपात्रातील कचरा तातडीने उचलून नदीपात्र स्वच्छ करा, त्यासाठी दोन ते तीन कर्मचारी नियुक्त करा असे आयुक्तांनी नमूद केले. स्वच्छतेसाठी कचरावेचक, भंगारवाल्यांची मदत घेण्याची त्यांनी सूचना केली. 
आयुक्तांची शहरातील पाहणी सुरूच राहणार असून, मंगळवारी ते पायी फिरले. मात्र, बुधवारपासून (ता. 11) ते वॉर्डात दुचाकीवरून फिरणार आहेत. वॉर्ड अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे अशी सूचना त्यांनी केली आहे. 

संबंधित बातमी : नवे आयुक्‍त मांडणार का महापालिकेत ठाण ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad AMC Commissioner Astik Kumar Pandey