आयुक्तांच्या स्वागताला जाताय तर जरा जपूनच... अन्यथा लागू शकतो दंड

माधव इतबारे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

भाजपच्या नगरसेविका मनीषा मुंडे यांना आयुक्तांनी झटका दिला. मनीषा मुंडे यांनी सकाळी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पेन भेट दिला. या पेनला प्लॅस्टिक कव्हर लावण्यात आले होते. त्यामुळे श्रीमती मुंडे यांच्याकडून पाच हजार रुपये वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

औरंगाबाद- महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वागताला येताना कॅरिबॅगमध्ये पुष्पगुच्छ आणला म्हणून अधिकाऱ्याला पाच हजार रुपये दंड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता. 10) त्यांनी एका नगरसेविकेला झटका दिला. मोठ्या आनंदाने नगरसेविकेने आयुक्तांना पेन भेट दिला मात्र त्यावर प्लॅस्टिक कव्हर असल्यामुळे या नगरसेविकेला पाचशे रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. 

महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. नऊ) पदभार स्वीकारला. सकाळी आयुक्त दालनात येताच अधिकाऱ्यांची स्वागतासाठी गर्दी झाली. नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन हे देखील पुष्पगुच्छ घेऊन आयुक्तांच्या दालनात आले. त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ कॅरिबॅगमध्ये होता. हा प्रकार लक्षात येताच आयुक्तांनी महाजन यांना पाच हजार रुपयांचा दंड लावला. या प्रकारानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नगरसेविका मनीषा मुंडे यांना आयुक्तांनी झटका दिला. मनीषा मुंडे यांनी सकाळी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पेन भेट दिला. या पेनला प्लॅस्टिक कव्हर लावण्यात आले होते. त्यामुळे श्रीमती मुंडे यांच्याकडून पाच हजार रुपये वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यांना लगेच पाचशे रुपये दंडाची पावती देण्यात आली. 
हेही वाचा : सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगणा अटकेत 
प्रत्येक विभागात जाऊन विचारले कामे कसे करता? 
आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. नऊ) पदभार घेताच मुख्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन झाडाझडती घेतली. तुमचे काम कसे चालते? याचे ट्रायल द्या, अशा सूचना करत स्वतः आयुक्त समोर बसल्याने अनेकांची मात्र भंबेरी उडाली. काय कामे सुरू आहेत? काम कसे करता, माझ्या समोर करून दाखवा, अशा सूचना आयुक्तांनी करताच अनेकांना घाम फुटला. काहींना बोलताही आले नाही. त्यामुळे स्वतः फाइल हातात घेऊन त्यांनी माहिती घेतली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच त्यांनी त्यांना न बोलण्याची तंबी आयुक्तांनी दिली. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. 
 हेही वाचा : खळबळजनक : मोदींची सेफरुम होती सुपारी बहाद्दराच्या जागेत 
सुस्त अधिकारी झाले सावध 
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक गेल्या दीड महिन्यापासून सुटीवर होते. आपल्या कार्यकाळात बहुतांश वेळा ते सुटीवर होते. शहरात असून देखील ते महापालिका मुख्यालयात न येता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातूनच कारभार पाहत. त्यामुळे दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांची चलती होती. गेल्या वर्षभरापासून महापालिकेत कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे चित्र होते. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीदेखील दीड महिन्याच्या काळात महापालिका मुख्यालयात फेरफटकाही मारला नाही. त्यामुळे निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना सोमवारी नवे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी झटका दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Commissioner News