नवे आयुक्त मांडणार का महापालिकेत ठाण?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - महापालिकेला लाभलेले आयुक्त वर्षे-दीडवर्षात परत जाण्याची जणू परंपराच बनली आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले अधिकारी व सत्तेला चिटकून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अभद्र युतीवर मात करत नवे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय पुढील तीन वर्षे महापालिकेत ठाण मांडणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पहिल्या दिवसाची "डॅशिंग' सुरवात करणारे पाण्डेय शहरातील महत्त्वाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करतील, याविषयी नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

मराठवड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराची गेल्या काही वर्षांपासून वाताहत झाली आहे. खड्‌डे, कचऱ्याचे शहर, पाण्याचा ठणठणाट अशी शहराची अपकीर्ती सर्वदूर झाली. तिजोरीत खडखडाट, शासनाकडून आलेला निधी खर्च न होणे, भ्रष्टाचार यामुळे महापालिकेची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत आहे. नव्या योजना मंजूर करताना शासन दरबारी आता महापालिकेला हीन वागणूक मिळत आहे. "तुम्हाला किती निधी द्या, काही खरे नसते', असे उद्‌गार मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या तोंडून बाहेर पडतात. विकास कामे रखडण्यामागे आयुक्तांची वारंवार बदली हेही कारण बनले आहे. औरंगाबादेत कोणीच आयुक्त टिकू शकत नाही, अशीही टीका वारंवार केली जाते. 

लुडबूड करणारे राजकारण
शहरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत घन कचरा व्यवस्थापनात देशभरात उल्लेखनीय काम करणारे डॉ. निपुण विनायक यांची महापालिकेत बदली केली. त्यांच्या अनुभवाचा फायदाही शहराला घेता आलेला नाही. महापालिकेतील सत्ताधारी व अधिकाऱ्यांची अभद्र युती व तसेच प्रत्येक कामात लुडबूड करणारे राजकारण "आयुक्तांना कामच करू देत नाही, असेही बोलले जाते. त्यामुळे एकतर आयुक्त स्वतःच बदली करून घेतात किंवा त्यांची बदली केली जाते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी 2009 ते 2013 असा आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत सहा वर्षात तब्बल सहा आयुक्त होऊन गेले. नवे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. नऊ) 27 वे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाची सुरवात डॅशिंग पद्धतीने केली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या पुन्हा एकदा अपेक्षा वाढल्या आहेत. महापालिकेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांची लॉबिंग तोडून आस्तिक कुमार पाण्डेय दंबगगिरी करणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सहा वर्षात बदली झालेले आयुक्त 
हर्षदीप कांबळे- 2013-14 
प्रकाश महाजन- 2014-15 
ओम प्रकाश बकोरिया- 2014-15 
डी. एम. मुगळीकर- 2017-18 
डॉ. निपुण विनायक- 2018-19 

अशी आहेत प्रमुख प्रलंबित कामे व निधी 
स्मार्ट सिटी- 1 हजार कोटी 
पाणीपुरवठा योजना- 1680 कोटी 
रस्ते कामे- 100 कोटी 
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प-147 कोटी 
सफारी पार्क-145 कोटी 
जुनी पाणीपुरवठा योजना सुधारणा-18 कोटी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com