साताऱ्याच्या अवलीयाची दुचाकीवरुन अवयवदान जनजागृती

योगेश पायघन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

औरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67 वर्षीय अवलीयाने शंभर दिवसांचा 22 राज्यातून दुचाकीवर जनजागृतीचा प्रवास सुरु केला.

औरंगाबाद : वयाच्या 49 व्या वर्षी 18 वर्षांपूर्वी गावातील सीआयएसएफ जवानाला एक किडनीदान केली. तेव्हापासून अवयदान जनजागृतीसाठी झटणाऱ्या 67 वर्षीय अवलीयाने शंभर दिवसांचा 22 राज्यातून दुचाकीवर जनजागृतीचा प्रवास सुरु केला.

प्रमोद महाजन (मु. पो. ढवळी, ता. वाळवा. जि. सांगली) असे त्या अवलीयाचे नाव आहे. शनिवारी (ता. 15) अकरा राज्य आणि साडेपाच हजार किमीचे अंतर कापत 54 व्या दिवशी शहरात आल्यावर एमजीएम व विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या वतीने झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, समन्वयक मनोज गाडेकर, जयेश ढबाले यांनी त्यांचे स्वागत केले. रविवारी ते बीडच्या दिशेने प्रवास सुरु करतील. या रॅलीचा समारोप शंभराव्या दिवशी पुण्यात होणार आहे. यानिमित्त त्यांनी शहरातील पत्रकारांशी संवाद साधला. 

याबाबत प्रमोद महाजन म्हणाले, एका किडनीवर देशभरात अवयवदानाच्या जनजागृतीच्या प्रवास करतोय. लोकांना लोकांच्या भाषेत अवयवदानाचे महत्व समजून सांगतोय. दात्याने प्रत्यक्ष सांगणे आणि डॉक्‍टरांनी सांगणे यात फरक आहे. लोकांना अजून याबद्दल बरीच माहिती द्यावी लागेल. तसेच व्यापक जनजागृतीची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गर्दीच्या ठिकाणी उभा राहीलो की अवयवदानाचा संदेश देणारे सजवलेली दुचाकीजवळ आपसुकच लोक जमा होतात. त्यांना माहिती देतो. रिबर्थ संस्थेचा सभासद असल्याने त्यांची आणि अवयवदान समित्या, राईडर्स ग्रुप या कामी मदत करत असल्याचेही ते म्हणाले.

"मरावे परी अवयवरूपी जगावे' असा संदेश या रॅलीमागचा हेतू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आत्तापर्यंत महाजन यांनी जवळपास 19 जणांना किडनीदान करण्यासाठी प्रोत्साहित केले असून, 9 जणांना मोफत प्रत्यारोपण करुन देण्यास निमित्तमात्र ठरल्याचा आनंदही असल्याचे सांगितले. पत्नी दोन मुले दोन मुली या सर्वांची इच्छा नसतांना हाती घेतलेल्या कार्यात आता तेही सहकार्य करत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: For Aurangabad Awareness Organ Donation start with Motorcycle

टॅग्स