बीओटीच्या प्रयोगामुळे काय झाले भाजीविक्रेत्यांचे 

मधुकर कांबळे 
रविवार, 8 डिसेंबर 2019

भाजीमंडईतील विक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी जागा दिली आहे; मात्र त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे कधी भाजीपाल्यात तोंड घालतील सांगता येत नाही.

औरंगाबाद - औरंगपुरा येथील जुन्या भाजीमंडईच्या जागेवर बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून तिथे भाजीविक्रेत्यांना गाळे देण्यात येणार होते; मात्र सात वर्षे होऊन गेली. संपूर्ण बीओटीच्या प्रकल्पांचीच वाट लागल्याने भाजीमंडईच्या जागेवर होणारे व्यापारी संकुलाचे कामही रखडले आहे.

यामुळे भाजीविक्रेत्यांना बारुदगर नाल्याच्या पलीकडील बाजूने पर्यायी जागेवर शेड बांधून देण्यात आले आहेत. या पर्यायी जागेमुळे नागरिकांना चार पावले दूर जावे लागत असले तरी यामुळे कोणतीही गैरसोय होत नाही. मात्र, भाजीविक्रेत्यांना व्यापारी संकुल लवकरात लवकर व्हावे आणि आम्हाला पुन्हा आमच्या पूर्वीच्या जागेत जाता यावे, अशी आशा आहे. 
औरंगपुरा येथे मध्यवर्ती ठिकाणी भाजीमंडई होती. लोकांना ते अतिशय सोयीचे होते; मात्र शहरात बीओटीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने महापालिकेच्या करोडो रुपयांच्या व अतिशय मोक्‍याच्या जागा खासगी व्यावसायिकांना बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर दिल्या. या जागा विकसित तर झाल्याच नाहीत; मात्र त्या इमारतीमधील व्यावसायिकांना निर्वासित व्हावे लागले. तत्कालीन महापालिका आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या कार्यकाळात 2011-12 मध्ये औरंगपुरा येथील भाजीमंडई पाडण्यात आली आणि तेथील भाजीविक्रेत्यांना बारुदगर नाल्याच्या उत्तरेकडील बाजूला जिथे पूर्वी स्वेटर विक्रेते असायचे, तिथे जागा देण्यात आली. 

संबंधित बातमी : औरंगाबादच्या बाजारात बसायचे तरी कुठे ? 

महापालिकेने तिथे भाजीविक्रेत्यांना शेड आणि ओटे बांधून दिले आहेत. तिथे सोयीसुविधा दिल्या असल्या तरी भाजीविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. पूर्वीची जागा ग्राहकांना माहीत होती; परंतु नाल्यापलीकडे भाजीमंडई आहे याची तेवढ्याच भागापुरती माहिती असून थोडक्‍यात ही भाजीमंडई जास्त ग्राहकांना माहीत नाही. यामुळे काही भाजीविक्रेते पिया मार्केटच्या परिसरात, रस्त्याच्या कडेने थेट औरंगपुऱ्यातील महात्मा जोतिराव फुले पुतळा चौकाच्या कोपऱ्यापर्यंत टोपले घेऊन बसत आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होतो तो वेगळाच. 
जुन्या जागेवर बीओटी तत्त्वावर होणाऱ्या व्यापारी संकुलासंदर्भात काही लोकांनी आक्षेप घेतला असून ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले आहे. 

बापरे ! : औरंगाबाद : वर्षभरात 28 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू 

मोकाट जनावरांचा त्रास 

जुन्या भाजीमंडईच्या जागेवर खोदकाम करून ठेवल्याने तिथे पावसाळ्यात मोठे तळे तयार होते आणि त्यात डास तयार होतात, दुर्गंधी येते. यामुळे आजुबाजूच्या रहिवाशांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. या भाजीमंडईतील विक्रेत्यांना महापालिकेने पर्यायी जागा दिली आहे; मात्र त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट जनावरे कधी भाजीपाल्यात तोंड घालतील सांगता येत नाही, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही या जनावरांपासून सांभाळूनच खरेदी करावी लागत आहे. निर्वासितांसारखा दुसरीकडे व्यवसाय करावा लागत असलेल्या भाजीविक्रेत्यांनी बीओटी तत्त्वावर करा, कसेही करा पण महापालिकेने तिथे व्यापारी संकुल लवकर करून आम्हाला आमच्या हक्‍काच्या जागेत गाळे देण्यात यावेत, अशी मागणी विक्रेते करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad BOT experiment vegetable vendors