औरंगाबादच्या बाजारात बसायचे तरी कुठे? 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : आपल्याला जसा रोज ताजा भाजीपाला हवाय, तशीच भाजीपाला विक्रेत्यांना बसायला छानशी जागा हवीय; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही सुविधा नसलेल्या टीव्ही सेंटर येथील भाजीमार्केटमध्ये आजही विक्रेते सुविधांची वाट पाहत आहेत. आता कधी सुविधा मिळतील, हे मात्र सांगता येणार नाही. 

शहराने प्रगती केली, असा दावा नेहमीच केला जातो; मात्र शहरात कुठल्या सुविधा मिळतात, असे विचारले तर पटकन कुणालाही सांगता येणार नाहीत, अशी स्थिती आहे. दैनंदिन लागणाऱ्या वस्तू मिळणारी ठिकाणे प्रत्येक भागात आहेत. टीव्ही सेंटर परिसरातील ताठे मंगल कार्यालयासमोरील जागेत भाजीपाला मार्केट आहे. या ठिकाणी रोज हा बाजार भरतो.

जाधववाडी येथून भल्या सकाळी भाजीपाला खरेदी केल्यानंतर दुपारनंतर विक्रेते या ठिकाणी भाजीपाला घेऊन बसतात; मात्र ही जागा अपुरी पडत आहे. शिवाय बसल्यानंतर डोक्‍यावर काहीतरी छत असायला हवे म्हणून काठ्या लावून वरती मेनकापड लावून थातूरमातूर सोय करण्यात आलेली दिसते. कुठल्याही प्रकारची स्वच्छता झाल्याचे दिसत नाही.

जुने जे काही ओटे आहेत त्या ठिकाणी गवत उगवलेले आहे. स्वच्छता नसल्यामुळे अनेक ओटे रिकामेच दिसून येतात. खरेतर त्याची डागडुजी करायला हवी; मात्र वारंवार मागणी करूनही त्याची पूर्तता होत नसल्याने सुविधांशिवाय भाजीमार्केट असे म्हणावे लागते. या ठिकाणी काही विक्रेते रस्त्याच्या कडेला बसतात.

अनेकदा त्यांना उठवून लावले जाते. विनवण्या करून ते जागा मिळवतात आणि भाजीपाला विक्रीतून मिळालेल्या पैशातून आपला घरसंसार चालवतात. या परिसरासाठी टीव्ही सेंटर येथून सेंट्रल नाका येथे जात असताना डाव्या बाजूलादेखील एक छोटेखानी भाजीमार्केट आहे.

या ठिकाणीही गाड्या लावण्यासाठी दूरच; गाड्या थांबविण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे लांब कुठेतरी गाड्या पार्क करून भाजीपाला खरेदी करावी लागतो. भाजीपाला विक्रेत्यांकडून जागेची, पिण्यासाठी पाणी, स्वच्छतागृहाची मागणी होत आली आहे; मात्र आजही ही मंडळी प्रतीक्षेतच आहेत. 

वर्षभरापासून नवरा-बायको दोघेही भाजीपाला विकून घर चालवत आहोत. पती भाजीपाला गाडीवरून विकतात; तर मी टीव्ही सेंटरच्या भाजीमार्केट येथे विकते; मात्र जागा मिळत नसल्याने रस्त्याच्या कडेला बसूनच भाजी विकत आहोत. बऱ्याचदा महापालिकेचे कर्मचारी उठवून लावतात. आम्हाला जागा उपलब्ध करून द्यायला हवी. 
- नंदा राजू घोरपडे, भाजीविक्रेत्या. 

आमच्या घरातील अनेकजण या व्यवसायात आहेत. मिसारवाडी येथून सकाळी जाधववाडी येथे भाजीपाला खरेदी करतो. त्यानंतर दुपारपासून भाजीपाला, फळे विक्री सुरू करतो. भाजीपाला विक्रेत्यांसाठी हक्‍काची जागा मिळायला हवी. 
- शांताबाई मगरे, फळविक्रेत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com