औरंगाबादच्या ईएसआयएस रुग्णालयात औषध टंचाई 

योगेश पायघन
शनिवार, 8 डिसेंबर 2018

केवळ रेफरल सेंटर 
शहरातील घाटीसह मुंबईतील जेजे व केईएम रुग्णालयांत सेकंडरी टर्शरी केअरसाठी रुग्ण रेफर केल्याची संख्या वर्षभरात पाच हजारांवर पोचली आहे. तर शहरातील करार झालेल्या नऊ रुग्णालयांतही तितकेच रुग्ण रेफर केले. नुकतेच स्त्रीरोगतज्ज्ञ मिळाल्याने त्या विभागात शस्त्रक्रिया व दुर्धर आजारांना सुरवात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीत राज्य कामगार विमा योजना (ईएसआयएस) रुग्णालय सध्या औषध कोंडीला सामोरे जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हाफकिनकडून औषध पुरवठा होईल, या आशेवर बसलेल्या रुग्णालयाचा कारभार अंधेरीच्या मॉडेल हॉस्पिटलने दिलेल्या 54 औषधांवर सध्या सुरू आहे. 

औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या शहरात शेंद्रा, वाळूज, पैठण, चिकलठाणा यांसारख्या नावाजलेल्या औद्योगिक वसाहतींच्या कंपन्यांमध्ये 1 लाख 76 हजार ईएसआयएस विमाधारक आहेत. त्यांच्यासाठी 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. मात्र, हे रुग्णालय केवळ स्त्रीरोग व प्रसूती, मेडिसीन, अस्थिव्यंगोपचाराच्या सेकंडरी टर्शरी केअर म्हणून राहिले आहे. सुपर स्पेशालिटीसाठी नऊ रुग्णालयांसाठी करार आहेत. तर इतर आजारांच्या सेकंडरी टर्शरी केअरसाठी केवळ रेफरल सेंटर म्हणून ईएसआयएस रुग्णालय भूमिका पार पाडत आहे. 

पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती असताना तोकडे मनुष्यबळ, औषधी, साधनसामग्रीची कमतरता व इच्छाशक्तीअभावी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागावर धन्यता मानत आहे. याचा मनस्ताप कामगार रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. औषधी टंचाईमुळे औषधांचा भारही रुग्णांना सहन करावा लागत असल्याने ईएसआयएसपेक्षा घाटी बरी असे म्हणण्याची वेळ दर महिन्याला पगारातून ईएसआयसीचे पैसे भरणाऱ्या विमाधारकांवर आली आहे.

केवळ रेफरल सेंटर 
शहरातील घाटीसह मुंबईतील जेजे व केईएम रुग्णालयांत सेकंडरी टर्शरी केअरसाठी रुग्ण रेफर केल्याची संख्या वर्षभरात पाच हजारांवर पोचली आहे. तर शहरातील करार झालेल्या नऊ रुग्णालयांतही तितकेच रुग्ण रेफर केले. नुकतेच स्त्रीरोगतज्ज्ञ मिळाल्याने त्या विभागात शस्त्रक्रिया व दुर्धर आजारांना सुरवात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

अंधेरी रुग्णालयाकडून काही दिवसांपूर्वी 54 प्रकारच्या औषधी मिळाल्या होत्या. त्यावर सध्या रुग्णालय सुरू आहे. हाफकिनकडून महिनाअखेर औषधी मिळण्याची शक्‍यता आहे. 
- डॉ. विवेक भोसले, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयएस रुग्णालय, चिकलठाणा.

हाफकिन महामंडळाच्या पुरवठ्याकडे लागले डोळे 
- 1 लाख 76 हजार विमाधारक 
- 100 खाटांचे रुग्णालय 
- अर्धीअधिक पदे रिक्त
- केवळ 17 डॉक्‍टर 
- बंधपत्रित व कंत्राटी डॉक्‍टरांवर भिस्त 
- सर्जरी, नेत्ररोग, बालरोग तज्ज्ञांची गरज 
 

Web Title: Aurangabad ESIC hospital inadequate medicine