बाबासाहेबांच्या पुतळ्याला पहिला पुष्पहार हबीबमामूंचा 

सुशिल राऊत 
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हबीबमामू म्हणाले, मी दहा वर्षाचा असतानापासून फुले विकण्याचे काम करतात. गेल्या 30 वर्षांपासून इथे फुलांचे हार विकत आहे.मामुंचा पहिला दिवस, त्यावेळी एक रूपयाला हार, दिवसभरात त्यांनी साठ रूपये कमावले होते.आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन अशा दिवशी भडकल गेट येथे मी पहाटे येतो आणि सकाळी 6 वाजता पहिला पुष्पहार मी अर्पण करतो आणि नंतर दुकान मांडतो. मी जो पर्यंत जीवंत आहे, हात पाय चालतात तोपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेबांना माझाच पहिला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत राहणार.

औरंगाबाद -  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, महापरिनिर्वाण दिन असो भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पहिल्यांदा हार घालतात ते हबीबमामू. तेही तब्बल गेल्या 30 वर्षांपासून. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी या महामानवाच्या पुतळ्याला पहिल्यांदा पुष्पहार घालत जाईन अशी त्यांची इच्छा आहे. आता प्रश्‍न पडेल की कोण आहेत हे हबीबमामू? 

महापरिनिर्वाण दिन असेल किंवा 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा संविधान दिन या दिवशी शहरातील तमाम आंबेडकरी जनता जमते ती भडकल गेट येथे. आपले उद्धारकर्त्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी सर्वजण येथे जमतात. सर्वत्र गर्दी दिसते, नेत्यांची भाषणे होतात, ढोल ताशांचे गजर होत असतात वातावरण अगदी मंत्रमुग्ध करणारे असते मात्र या गर्दीच्या एका कोपऱ्यावर वयाची सत्तरी गाठलेले हबीबमामू बाजूला फुलांचे हार लटकावउन आणि काही हार हातात घेउन कोणीतरी आपल्याकडे फुलांचे हार घेण्यासाठी येईल या आशेने थांबलेले असतात.

बेगमपुरा येथे राहणारे शेख हबीब पण सर्वजण त्यांना हबीबमामू नावानेच ओळखतात. तीन मुले, दोन मुली. फुले विक्रीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. फुलांचा हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय असून त्यांनी फुल विक्रीवरच मुलांना लहानाचे मोठे केले आहे. या व्यावसायात ते तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. भडकल गेट येथे अशा विशिष्ट दिवशी फुलांचे हार विकणारे ते पहिलेच. त्यांच्यानंतर एक एक हार विक्रेते वाढत गेले. 

हेही वाचा : पाकिस्तानात उभे राहणार आंबेडकर भवन 

हबीबमामू म्हणाले, मी दहा वर्षाचा असतानापासून फुले विकण्याचे काम करतात. गेल्या 30 वर्षांपासून इथे फुलांचे हार विकत आहे.मामुंचा पहिला दिवस, त्यावेळी एक रूपयाला हार, दिवसभरात त्यांनी साठ रूपये कमावले होते.आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन अशा दिवशी भडकल गेट येथे मी पहाटे येतो आणि सकाळी 6 वाजता पहिला पुष्पहार मी अर्पण करतो आणि नंतर दुकान मांडतो. मी जो पर्यंत जीवंत आहे, हात पाय चालतात तोपर्यंत महामानव डॉ. बाबासाहेबांना माझाच पहिला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत राहणार.

मराठीत स्पष्टपणे संवाद साधणारे हबीबमामू म्हणतात, बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ट राज्यघटना दिली. प्रत्येकाला सामानतेचा अधिकार देऊन सन्मानाने जगायला शिकवले. ते औरंगाबादमध्ये आल्याचे मला थोडे थोडे आठवते. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट होउ शकली नसली तरी भडकल गेट येथील त्यांच्या या पुतळ्याला माझा पहिला पुष्पहार अर्पण करत राहणार आहे. 

क्‍लिक करा : महामानवाला नांदेडमध्ये अभिवादन 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Habibamamu's first wreath to the statue of Babasaheb Ambedkar