पाण्यावर पेटला दिवा अन्‌ बाटलीतून दूध झाले गायब! 

औरंगाबाद : पाण्यावर पेटवलेला दिवा
औरंगाबाद : पाण्यावर पेटवलेला दिवा

औरंगाबाद- काय सांगता...? पाण्यावर दिवा पेटला! रिकाम्या तांब्यातून तीर्थ निघाले! बाटलीतून दूध गायब झाले...! हे प्रकार तसे कुणालाही चमत्कार वाटू शकतात. त्यातून बुवा, बाबा भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करतात. त्यामुळे यासारख्या बुवाबाजीच्या अनेक घटनांमागील विज्ञान महाराष्ट्र "अंनिस'च्यावतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

निमित्त होते औरंगाबाद तालुक्‍यातील पिंपळगाव (पांढरी) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आयोजित अंनिसच्या कार्यक्रमाचे. साधारणत: कोणत्याही कार्यक्रमाचे उद्‌घाटन समई पेटवून किंवा नारळ फोडून केले जाते. येथे मात्र मुख्याध्यापक शिवाजी काकडे यांच्या हस्ते करण्यात आले ते त्यांनी चक्‍क दिव्यात तेलाऐवजी पाणी वापरलेला दिवा पेटवून! पाण्यावर पेटवण्यात आलेला दिवा पाहून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ आवाक झाले. कार्यक्रम होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. चमत्कारामागील विज्ञान समजावुन सांगणारे भाऊ पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री. काकडे यांनी हा दिवा पेटवला आणि बुवा बाबा भोळ्या-भाबड्या जनतेला हातचालाखीने कसे गंडवतात हे पाहून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे डोळे उघडले. 

जनजागृतीचे कार्य 

वारकरी संप्रदायाने म्हणजे संत नामदेव महाराज ते संत तुकडोजी महाराज यात प्रामुख्याने संत तुकाराम महाराजांनी व्रतवैकल्ये, नवस, भविष्य सांगणे, भूत वा देव अंगात येणे, जाती प्रथा, यज्ञ, मुक्ती वा मोक्ष यांवर जोरदार प्रहार केले. झाडे व वने तयार करणे, व्यसनमुक्ती, खरी ईश्वर भक्ती यावरही त्यांनी भाष्य केले आहे. आज बहुजन समाज जागृत होण्यासाठी समाज जागृतीचे अभंग समजावून घेण्याची वेळ आली आहे. "चमत्कारामागील विज्ञान' या विषयावर शाळांमधून, गावागावातुन भाऊ पठाडे 2015 पासून जनजागृतीचे काम करत आहेत. बॅंकेतून अधिकारीपदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले आहे. औरंगाबाद तालूक्‍यातील पिंपळगाव येथे त्यांनी नुकताच चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम सादर करुन जनजागृती केली.

बुवा बाबांपासून रहा सावध

पाण्यावर दिवा पेटवणे, नजरेच्या शक्तीने अगरबत्ती स्वतः भोवती फिरवणे, मंत्राने यज्ञ अग्नी पेटवणे, रिकाम्या तांब्यातून तीर्थ काढून दाखवणे, नारळातून करणी काढणे, तांब्यात भुते खुंटवणे, बाटलीतून दूध गायब करणे, जळते पालिते गिळणे, जळता कापूर हातावर जिभेवर धरणे व गिळणे, जिभेत त्रिशूळ टोचणे, लाल कुंकू मंत्राने काळे करणे, पिवळी हळद लाल करणे, कमरेचा लाल दोरा लिंबू मंत्राने काळा करणे, मिड ब्रेन ऍक्‍टिव्हेट करणे, लिंबे भारून त्यावर प्रकाश दिवा लावणे, मंत्राने लंगर सोडवणे, ब्रशच्या सहाय्याने मेंदू विकार भ्रम आदी प्रयोग त्यांनी करून दाखविले. तसेच यामागील विज्ञान स्पष्ट केले.

कुणालाही चमत्कार करता येत नाही आणि कुणी करत असल्यास समितीचे 21 लाखांचे बक्षीस तो सशर्त पटकावू शकतो, असे सांगून बुवा बाबा पासून सावध राहण्याचे, विवेकाने राहून डोके चालवण्याचे व सर्पदंश झाल्यास मांत्रिकाकडे न जाता सरकारी दवाखान्यात नेण्याचे आवाहन भाऊ पठाडे यांनी केले. 200 ते 250 विद्यार्थांनी लाभ घेतला. कार्यक्रमासाठी श्री. मते, मधुकर तवार, सुधाकर तवार यांनी परिश्रम घेतले.

कपभर पाणी मावेल एवढ्या पितळी तांब्यात पाणी टाकून त्यावर पाण्याचा दिवा पेटवता येतो. पात्रात पाणी टाकण्यासाठी असलेल्या नळीच्या फिरकीशेजारी कॅलशियम कार्बाईडचा खडा ठेवला जातो. फिरकी उचलून त्यात पाणी टाकले जाते. फिरकी उचलताना खडाही उचलला जातो. कॅलशियम कार्बाईड हे गॅस वेल्डिंगसाठी आणि कृत्रीमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरले जाते. कॅलशियम काबाईडचा हवेशी संसर्ग झाल्याने त्यातून निघणारा गॅस पेट घेतो यामुळे पाहणाऱ्याला वाटते वात नसतानाही पाण्यावर दिवा पेटला! असे अनेक चमत्कारामागचे विज्ञान समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. 

- भाऊ पठाडे, कार्यकर्ते, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com