मेंदू न उघडता ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • डॉ. टी. एन. जानकीराम यांची माहिती 
  • अँजियोफायब्रोमाचे रुग्ण वाढताहेत 
  • औरंगाबाद, सोलापूर परिसरातील 24 शस्त्रक्रियांचा समावेश
  • तामिळनाडूतील त्रिचीमध्ये सुविधा

औरंगाबाद - नाकातून ब्रेन ट्युमरच्या शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित झाले असून, त्यासाठी अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. यामध्ये अँजियोफायब्रोमा या ब्रेन ट्युमरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. जगभरातून रुग्ण तामिळनाडूतील त्रिचीमध्ये या शस्त्रक्रियेसाठी जात असून, आतापर्यंत चारशे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात औरंगाबाद आणि सोलापूर परिसरातील 24 शस्त्रक्रियांचा समावेश असल्याची माहिती प्रख्यात स्कलबेस सर्जन डॉ. टी. एन. जानकीराम यांनी दिली. 

एमजीएममध्ये कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या परिषदेत मार्गदर्शनासाठी आले असता त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. तामिळनाडूमधल्या त्रिचीमध्ये जगभरातून अँजियोफायब्रोमाबाबत शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण जातात. त्याबाबत डॉ. जानकीराम यांची याबाबत विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच पाकिस्तान, इजिप्त यासह इतर देशांतून रुग्ण या ठिकाणी येत असल्याचे ते म्हणाले. 
  
काय आहे स्कल बेस सर्जरी 
मेंदूच्या खाली आणि नाकाच्या वरच्या भागाला स्कल बेस म्हणतात. 1906 पासून या शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन करतात. ब्रेन ट्युमर नाकाच्या माध्यमातून एंडोस्कोपीद्वारे काढला जातो. या रुग्णाच्या बाबतीत अनेकदा डोके खूप दुखणे, चक्कर येणे, अचानक बेशुद्ध पडणे असे पेशंट येतात; मात्र त्याबाबत एमआरआय घेतल्यानंतर ट्युमर कुठे आहे कळते. नाकातून शस्त्रक्रिया
करण्याचे हे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहे. भारत, इजिप्त तसेच हिमालय परिसर, सोलापूर, औरंगाबाद भागातही हे रुग्ण आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. हा आजार फक्त पुरुषांमध्येच असतो, असेही ते म्हणाले. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

नाक-कान-घसा तज्ज्ञांच्या परिषदेस सुरवात 
 
कान-नाक-घसा तज्ज्ञांची संघटना आणि एमजीएमतर्फे आयोजित "मेंटकॉन 2019' या चारदिवसीय राज्यस्तरीय परिषदेला गुरुवारी (ता. 28) सुरवात झाली. कान आणि नाकाद्वारे करण्यात येणाऱ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण पहिल्या दिवशी झाले. शुक्रवारी परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन होणार असून, सुमारे 25 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया या परिषदेत करण्यात येणार आहेत. 

जयपूरचे प्रख्यात स्कल बेस सर्जन डॉ. सतीश जैन यांनी कानाद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले. दुपारच्या सत्रात डॉ. टी. एन. जानकीराम यांनी नाकाद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया कशा कराव्यात, हे शिकवले. यावेळी दोनशेवर तज्ज्ञांची कार्यशाळेस उपस्थिती होती. 
रुक्‍मिणी हॉल येथे होत असलेल्या या परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन शुक्रवारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे.

हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

तसेच यानंतर डॉ. टी. एन. जानकीराम, डॉ. सतीश जैन हे काही गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण परिषदेत सहभागी डॉक्‍टरांसाठी करण्यात येणार आहे.  परिषदेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. समीर देशमुख, सचिव डॉ. सचिन नगरे, डॉ. जितेंद्र राठोड, डॉ. अतुल पोरे, डॉ. अमोल सुलाखे, डॉ. सारंग जिंतूरकर, डॉ. श्रीकांत सावजी, डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. किरण मुंदडा, डॉ. रितेश भाग्यवंत यांच्यासह संयोजन समितीचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brain Tumor Surgery Without Opening Brain