esakal | बीडमधून धनंजय मुंडे की सोळंके, मंत्रीपद कुणाला?
sakal

बोलून बातमी शोधा

Will Dhananjay Munde get a cabinet?
  • बंडाला साथ दिल्याने श्रेष्ठींची खप्पामर्जी
  • जिल्ह्यात एकाला निश्‍चित मंत्रिपद 
  • धनंजय मुंडेंचे नाव आघाडीवर
  • ज्येष्ठत्वामुळे सोळंकेही आशावादी 
  • संदीप क्षीरसागरांनीही जिंकली पवार कुटुंबीयांची मर्जी 

बीडमधून धनंजय मुंडे की सोळंके, मंत्रीपद कुणाला?

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी जुळवली. राज्याचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत असताना पुतणे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या तात्कालिक बंडाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साथ दिल्याने साहजिकच श्रेष्ठींची खप्पामर्जी झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातून एकाला कॅबिनेट मंत्रिपद निश्‍चित असल्याची माहिती आहे. 

यासाठी धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर असून, ज्येष्ठत्वाच्या मुद्द्याने प्रकाश सोळंकेही आशावादी आहेत. संदीप क्षीरसागर यांनीही पवार कुटुंबीयांची मर्जी संपादन केल्याने त्यांनाही चांगली संधी मिळण्याची आशा आहे. राज्यात नाही भेटली तरी मिनी मंत्रालयात त्यांच्या आईला ही संधी दिली जाईल, असा अंदाज आहे. 

मागच्या निवडणुकीत चांगलाच पाडाव झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला यावेळी जिल्ह्यात अच्छे दिन आले. सहापैकी चार जागा जिंकत राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे अशा दिग्गजांचा पराभव करण्याची किमया अनुक्रमे धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे यांनी साधली.

दरम्यान, भाजप - सेना युती तुटल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशी मोट बांधण्यात शरद पवार यशस्वी झाले. प्रतिकूल परिस्थितीतही श्री. पवार यांच्या राजकीय कौशल्याने राज्यात वेगळे चित्र निर्माण होत असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीने पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकारणात मोठे ट्‌विस्ट तर निर्माण झालेच. परंतु पवारांच्या घरात बंडखोरीमुळे याची अधिकच चर्चा झाली.

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

परंतु पवारांच्या त्या निर्णय वा बंडखोरीला धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके यांची साथ मिळाल्याच्या बातम्या आल्या. धनंजय मुंडे यांचे फोन आले आणि त्यांच्याच बंगल्यात बोलविल्याचे आमदारांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत थेट सांगितले. त्यातच धनंजय मुंडे यांचे त्या दिवसभर "नॉट रिचेबल' असणे आणि शरद पवार यांच्या सांगण्याशिवाय अजित पवार अशी भूमिका घेऊ शकत नाहीत, अशी प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया पाहता दोघांचाही अजित पवार यांना पाठिंबा होता, हे स्पष्ट झाले. त्यामुळे या दोघांवर पक्षातील वरिष्ठ आणि श्रेष्ठींची खप्पामर्जी झाल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवार यांच्यासोबत गेलेले संदीप क्षीरसागर यांनी दोन तासांतच "यू टर्न' मारत आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केल्याने संदीप क्षीरसागर यांच्यावर पवारांची मर्जी वाढल्याची माहिती आहे.

मात्र, या आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यातील नेत्यालाच बीडचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यात धनंजय मुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, खप्पामर्जीमुळे कदाचित मनाजोगे खाते मिळेलच अशी शाश्‍वती राहिलेली नाही. तर, चौथ्यांदा आमदार आणि यापूर्वीचा मंत्रिपदाचा अनुभव म्हणून प्रकाश सोळंकेदेखील मंत्रिपदासाठी आशावादी आहेत. एव्हाना त्यांच्या नावाची चर्चाही आहे. 
 

हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

मुंडेंना बळ शरद पवारांमुळेच  

धनंजय मुंडेंचा त्याकाळी झालेला राष्ट्रवादी प्रवेश अजित पवार यांच्या पुढाकाराने झाला. त्यावेळी शरद पवार प्रवेशासाठी अनुकूल नव्हते. नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आणि अलीकडच्या काळात बीड जिल्ह्यात झालेल्या सभांत पवारांनी धनंजय मुंडेंना अधिकच बळ दिले. तरीही मुंडेंनी अजित पवार यांच्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने नाराजी असल्याची माहिती आहे. 
 

म्हणून मिळणार संदीप क्षीरसागरांना बळ  
 

राष्ट्रवादीतून फुटून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली होती. पवारांनीही याची थेट दखल घेत जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबत शेरेबाजी केली होती. तर, शरद पवार यांच्यासोबत असल्याची सर्वात अगोदर भूमिका जाहीर करून संदीप क्षीरसागर पवारांच्या अधिकच जवळ गेले आहेत. या समीकरणात जरी संदीप क्षीरसागर यांना राज्यपातळीवर संधी देता आली नाही तरी जिल्ह्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते. या आघाडीमुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तास्थापनेची संधी आली असून अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. त्यामुळे त्यांच्या आई रेखा क्षीरसागर यांचे नाव पुढे येऊ शकते.