esakal | Corona Vaccine: मराठवाड्यात लसींचा तुटवडा; औरंगाबादेत सोमवारपर्यंत प्रतीक्षा

बोलून बातमी शोधा

corona Vaccination
Corona Vaccine: मराठवाड्यात लसींचा तुटवडा; औरंगाबादेत सोमवारपर्यंत प्रतीक्षा
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात महापालिकेने लसीकरणाची जम्बो मोहीम हाती घेतली होती. पण शुक्रवारी (ता. २३) दुपारनंतर अनेक केंद्रावरील लसींचा साठा संपल्याने नागरिकांना आल्यापावली परत फिरावे लागले. आता लसींचा नवा साठा मिळण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २६) लसीकरण सुरू होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लातूर, बीड जिल्ह्यातही साठा संपला असून जालना, उस्मानाबादेत तुटवडा आहे.

शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोहीम सुरू केली होती. त्यानुसार ११५ वॉर्डात प्रत्येकी एक व खासगी २६ सरकारी दोन अशा १४३ सेंटरवर लसीकरण केले जात आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यापासून गती आली असून, आजपर्यंत एख लाख ९० हजार जणांना लस टोचण्यात आली आहे. शहरात दररोज सुमारे सहा ते सात हजार नागरिकांना लस दिली जात आहे. पण शासनाकडून मुबलक प्रमाणात लसींचा साठा मिळत नसल्याने लसीकरणात अडथळे येत आहेत.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत आठ हजार रुग्ण; १७३ जणांचा मृत्यू

दर आठवड्याला एक लाख लसींचा साठा मिळावी, अशी महापालिकेची मागणी आहे पण तीस ते पन्नास हजार लस दिल्या जात आहेत. तीन दिवसापूर्वी महापालिकेला १५ हजार ९०० लस मिळाल्या होत्या. पण त्या शुक्रवारी दुपारी संपल्या. अनेक सेंटरवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. एकीकडे लस घेण्यासाठी जनजागृती केली जात असताना दुसरीकडे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी परत जावे लागले आहे, अशा शब्दात नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला. जवळपास ८० सेंटरवरील लस संपल्यामुळे दुपारनंतर शुकशुकाट होता. आरोग्य कर्मचारी बसून होते. अनेकांनी लस कधी येणार अशी विचारणा केल्यानंतर कर्मचारी ठामपणे सांगता येत नाही, असे उत्तर देत होते.

८० केंद्रांवरून आले मेसेज-

टास्क फोर्सप्रमुख तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारनंतर अनेक लसीकरण केंद्रावरील लस संपल्याची माहिती मिळाली. शहरातील सुमारे ७० ते ८० सेंटरवरील लस संपल्याचे मॅसेज प्राप्त झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Coronavirus|औरंगाबादच्या सीमा बंद; सहा ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

आठ केंद्रावर सुरू राहणार लसीकरण-

विविध आरोग्य केंद्रांकडे दोन हजार लस शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यामुळे शनिवारी आठ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. यात सिडको एन-८, बन्सीलालनगर, एन- ११, नारेगाव, हर्सुल, पुंडलीकनगर, शिवाजीनगर, सिल्क मिल्क कॉलनीचा समावेश आहे.