यापुढे बिबटे येतच राहणार, शहरवासियांनो आता सवय करुन घ्या

file photo
file photo

औरंगाबाद-  बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास असणारी जंगले कमी झाली, झाडोरा कमी झाला आणि त्यांनी स्वत:ला राहण्यासाठीच्या नवीन जागा तयार करुन घेतल्या. नैसर्गिक अधिवास धोक्‍यात आल्याने आता बिबट्यांनी उसाच्या शेतांची निवड केली आहे. कुत्री, डुकरे, कोंबडया हे त्याचे आवडते खाद्य खाण्यासाठी तो मानवी वस्त्यांच्या जवळ आला आहे. यामुळे तो नागरी भागात येतच राहणार. बिबट्यांची आता माणसांनी सवय करुन घ्यावी लागणार असल्याचे मत वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्‍त केले आहे. 

सिडकोत बिबट्याचा आठ तास वावर होता. या पार्श्‍वभूमीवर अभ्यासक तज्ज्ञ यांनी माहिती दिली. चार पाच वर्षांपुर्वी कर्णपुरा देवी मंदीराच्या मागे उसाच्या शेतीमध्ये बिबट्या आला होता. लगतच्या उसाच्या लागवडीमुळे तो इथे आला होता. बिबट्यांनी स्वत:चे वसतीस्थान जंगल सोडून उसाच्या शेतांना बनवले असून उसाच्या शेतीशी जुळवून घेतले आहे. कारण नागरी भागाच्या जवळच त्यांना त्यांचे कुत्रे, डुक्‍कर, कोंबडया हे आवडते खाद्य मिळत आहे. हर्सूल सावंगी घाट ते पिसादेवी, पळशी घाट या परिसरातील डोंगराळ भाग व शहराभोवतीची उसाची शेती या भागातून तो आला असावा. लगतच्या पट्ट्यात जाताना इकडे वळला असावा. रात्रीच्या वेळी तो आला असला तरी तो लोकांना दिसला नाही. सकाळी फिरायला गेलेल्या लोकांना तो दिसला.  

माणसाच्या वाटेला जात नाही 

निसर्गप्रेमी व वन्यप्राणी पक्षांचे छायाचित्रकार रंजन देसाई म्हणाले, की कोलठाण, पोखरी, पळशी या भागातून तो चुकून आला असावा. डोंगर दऱ्यातून बिबट्यांचा वावर आहे. ऑक्‍टोबर, नोव्हेबर हा बिबट्यांचा मेटींगचा काळ असून तो त्यांच्या अधिवासात फिरताना चुकून शहरात आला असावा. माणसांच्या जवळपासच तो राहतो, हा प्राणी मार्जार कुळातील आहे. हा बिबटया आला त्या ठिकाणापासून सिडकोचे अंतर किमान 3-4 किलोमीटर चालून आला मात्र त्याने रात्रीच्याही वेळी कोणावर हल्ला केला नाही यातुन स्पष्ट होते की, बिबटे विनाकारण सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. दुरदुरपर्यंत प्लॉटींग झाली, सिमेंटरची घरे होऊ लागली आहेत. त्यांना लपण्यासाठी जागा राहिली नाही म्हणून ते आता नागरी भागाच्या जवळ येत आहेत. वस्तीस्थानांशी जुळवून घेऊ शकतो इतका त्याचा स्वभाव लवचिक आहे. 

आता माणसांनी सवय करुन घ्यावी 

नांदेड येथील मानद वन्यजीवरक्षक अतिंद्र बी. कट्टी म्हणाले, की बिबट हा निशाचर आणि अतिशय लाजाळू प्राणी आहे. शक्‍यतो माणसाला तो टाळत असतो. दोन पायाचा माणूस हे बिबट्याचे भक्ष्य नाही तर चार पायाचे प्राणी त्याचे भक्ष्य आहेत. यामुळे तो माणसांवर सहसा हल्ला करत नाही. माणसाला ठार मारण्यासाठी त्याला दोन मिनीटेही वेळ लागत नाही, मात्र तो तसे करीत नाही. हल्ला करतो म्हणजे आपण जाताना कोणाचा धक्‍का लागला, वाद झाला तर एखादी चापट मारतो तसा तो प्रकार असतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे, डुक्‍कर असतात. नागरी वस्त्यांजवळ या दोन प्राण्यांचा जास्त वावर असल्याने त्यांना खाण्यासाठी बिबट्या मानवी वस्त्यांच्या जवळ येतो. माणसांवर हल्ला त्याचवेळी करतो जेव्हा तो खाली बसलेला असेल तरच चार पायाचा प्राणी समजून तो हल्ला करत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये जंगल कमी होत असल्याने 80 टक्‍के बिबटे मानवी वस्त्यांच्या जवळ उसाच्या शेतांमध्ये राहू लागले आहेत. यामुळे आता शुगरकेन लेपर्डस्‌ अशी प्रजाती तयार होत आहे. गावात लोकांनी स्वच्छता ठेवावी आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. बिबट्या नागरी भागात आला म्हणजे तो हल्ले करीलच असे नाही यामुळे त्यांना डिवचू नये. नागरी वस्त्यांच्या जवळ बिबटे यापुढे येतच राहणार आता त्याची माणसांनी सवय करुन घेतली पाहीजे असे मत व्यक्‍त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com