औरंगाबादेतील उच्चभ्रू वसाहतीत घुसलाय बिबट्या

अतुल पाटील
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

औरंगाबाद शहरातील एन-एक परिसरात मंगळवारी (ता.3) सकाळी बिबट्या घुसला सकाळी सहा ते आठ बिबट्याचे दर्शन झाले; मात्र आठपासून तो अदृश्‍य झाला. वनविभागाचे कर्मचारी शोध घेत असून, भुलीच्या इजेक्‍शनची गन पाच तासांनी दाखल झाल्यानंतर सकाळी अकरापासून मिशन बिबट्या सुरु आहे. 

औरंगाबाद : शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एन-एक परिसरात बिबट्या घुसला आहे. काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना सकाळी सहा वाजता बिबट्या दिसला. त्यानंतर तब्बल दोन तास परिसरातील रहिवाशांनी बिबट्याला पाहिले. त्यानंतर मात्र, तब्बल तीन तासांपासून तो अदृश्‍य झाला आहे. बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठीची बंदुक तब्बल पाच तासानंतर दाखल झाली असून "मिशन बिबट्या'ला सुरवात झाली आहे. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

नाईक यांच्या बंगल्यात 
पहिल्यांदा दिसला बिबट्या 

सिडकोच्या एन-एक परिसरातील साकोळकर हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या प्रमोद नाईक यांच्या बंगल्यामागील परिसरात सगळ्यात पहिल्यांदा बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येते. नाईक हे गेल्या दीड महिन्यींपासून मुंबईला आहेत. परिसरातील झाडांची काळजी घेण्यासाठी बाजुच्या इस्त्रीवाल्याला सांगण्यात आले होते. ते सकाळी सहा वाजता झाडांना पाणी घालण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यावेळी बिबट्याने मागील उद्यानामध्ये उडी मारल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर सकाळी सहा ते सात उद्यानात बिबट्याला पाहिल्याचे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी सांगितले. सकाळी सात वाजता गणपती मंदीर आणि साकोळकर हॉस्पिटलपासून जळगाव रोडला लागून असलेल्या पूर्वीच्या मेन गेटपर्यंत बिबट्या आला होता. या वेळी समोरच उभ्या असलेल्या एका भाजीवाल्याची बिबट्याला पाहून भंबेरी उडाली. गोंधळ सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. साकोळकर यांच्या घरातील कामगार महिलांनी बाहेर धाव घेतली असता त्यांनाही बिबट्या दिसला. 

जाणून घ्या - मेंदू न उघडता ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया

दगड मारल्याने बिबट्या 
मंदिरातून पुन्हा उद्यानात 

सकाळी सात वाजेनंतर गणपती मंदिराशेजारील गोंधळ पाहून बिबट्या माघारी फिरला. त्यानंतर उद्यानाच्या उत्तर बाजुला असलेल्या हनुमान मंदिरात सकाळी आठ वाजता दिसल्याचे अंजली देशपांडे यांनी सांगितले. मंदिराच्या आग्नेय दिशेला असलेल्या डीपीखाली बिबट्या बसला होता. देशपांडे यांनी घराच्या गच्चीवरुन हा प्रकार पाहिला. लोक जमल्यानंतर काही लोकांनी बिबट्याला दगड मारले. त्यानंतर तो पुन्हा एन-एकच्या उद्यानात घुसल्याचे सांगितले. देशपांडे यांचे घर हनुमान मंदिर आणि उद्यानाच्यामध्ये आहे. मंदिर परिसरातून उद्यानात बिबट्या गेल्याचे महापालिकेच्या सफाई कामगार हौसाबाई दिवेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. त्या सफाई करण्यासाठी घंटागाडीसोबत फिरत होत्या. 

सद्य:स्थितीत काय सुरुय? 
सकाळी सहापासून नागरिक होतेच. त्यानंतर पोलिस आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी आले. मात्र, बिबट्या नागरी वसाहतीत असल्याने त्याला पकडताना बेशुद्ध करुनच पकडावे लागणार आहे. बेशुद्ध करण्याची बंदुक कन्नड (औरंगाबाद) येथून मागवण्यात आली. तब्बल पाच तासांनी बंदूक दाखल झाली; मात्र सकाळी साडेआठनंतर बिबट्याचे दर्शन झाले नसून मिशन बिबट्या सुरुच आहे. नागरिक हजारोंच्या संख्येने जमले असल्याने मोहिमेत अडथळा येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bibtya enters Aurangabad