भरधाव जीपच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेले चारजण ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - रोजच्यासारखे मॉर्निंग वॉकला निघालेल्या सहा जणांना जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ शनिवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हनुमान चौक भागातील एकाच गल्लीतील चार मित्रांच्या अपघाती मृत्यूने चिकलठाण्यावर शोककळा पसरली.

औरंगाबाद - रोजच्यासारखे मॉर्निंग वॉकला निघालेल्या सहा जणांना जालन्याकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण जखमी झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ शनिवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हनुमान चौक भागातील एकाच गल्लीतील चार मित्रांच्या अपघाती मृत्यूने चिकलठाण्यावर शोककळा पसरली.

पोलिसांनी सांगितले, की चिकलठाणा येथील भागीनाथ लिंबाजी गवळी (वय ४५), नारायण गंगाराम वाघमारे (वय ७३), दगडूजी बालाजी ढवळे (६०), अनिल विठ्ठल सोनवणे (वय ४५) ही अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर लहू बकाल आणि विजू करवंदे हे जखमी झाले. तत्पूर्वी, अनेक वर्षांपासून दहा ते पंधरा मित्रांचा ग्रुप दररोज पहाटे पाचला जालना रोडवर फिरायला जातो. चिकलठाणा गावाबाहेर गेल्यावर राममंदिराच्या मैदानावर व्यायाम करुन ते परततात. मात्र, शनिवारी पावसामुळे मैदानात चिखल झाल्याचे पाहून मॉर्निंग वॉकला गेलेल्या या सहा मित्रांनी व्यायाम न करता परत जाऊ, अशी चर्चा करत असतानाच केम्ब्रिज शाळेच्या चौकातून भरधाव येणाऱ्या (एमएच २७ एसी ५२८२) स्कॉर्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. यात जीपने गवळी, वाघमारे, ढवळे, सोनवणे या चौघांना चिरडत नेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन ती चारचाकी फसली. 

या अपघातानंतर कारचालक पसार झाला. अपघात झाल्याची वार्ता चिकलठाणा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त गाडीला हटवून जखमींना रस्त्याशेजारच्या पाण्याच्या नालीतून बाहेर काढून घाटीत हलवले. घाटीत डॉक्‍टरांनी तपासून चार जणांना मृत घोषित केले. दरम्यान, स्कॉर्पिओच्या चालकाचा शोध सुरु आहे. 

याप्रकरणी बेदरकार गाडी चालवणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, उपनिरीक्षक संदीप शिंदे, विलास पूर्णपात्रे, संजय मुंडेल, रत्नाकर बोर्डे हे तपास करीत आहेत. 

वेगवेगळ्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार 
नारायण वाघमारे व अनिल सोनवणे यांच्या पार्थिवावर चौधरी कॉलनी येथील स्मशानभूमीत दुपारी अडीचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. दगडूजी ढवळे व भागीनाथ गवळी यांच्यावर चिकलठाणा गावाच्या पूर्वेकडील स्मशानभूमीत दुपारी तीनच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले.

घाटीत नातेवाइकांचे सांत्वन 
खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपायुक्त वर्षा ठाकूर, महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, डॉ. कानन येळीकर, डॉ. सुरेश हरबडे यांनी घाटीत नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले. 

मुलांचे शिक्षण सुरु असताना वडिलांची अकाली एक्झीट
दगडूबा ढवळे हे कंपनीतील निवृत्त कामगार होते. त्यांना दोन मुले, दोन मुली आहेत. मोठा मुलगा वकील असून लहान मुलगा वकिलीचे शिक्षण घेत आहे. अनिल सोनवणे हे टेलरिंग व्यवसाय करीत होते. त्यांचा मुलगा हा पॉलिटेक्‍निकचे शिक्षण घेत असून मुलीचे लग्न झाले आहे. भागीनाथ गवळी हे दुपारच्या सत्रात रिक्षा चालवत. सकाळी त्यांचा मुलगा रिक्षा चालवतो. शनिवारी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही रिक्षा घेऊन बाहेर पडला.

तासाभरातच वडिलांचा अपघात झाल्याचे त्याला कळले. तर नारायण वाघमारे हे शेतमजुरी करत असून त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत.

वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू
औरंगाबाद - जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला. वाळूजजवळ कार कंटेनरवर धडकून सोलापूरचा शिक्षक दगावला, तर पिता-पुत्र जखमी झाले. अजिंठ्याजवळ बाळापूर वळणावर टेंपो, कारच्या धडकेत एकजण ठार, तर तिघे जखमी झाले.

Web Title: aurangabad marathwada news 4 death in accident