पाच अग्निशमन केंद्रांच्या निविदा प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

औरंगाबाद - महानगरपालिका शहराच्या विविध भागांत पाच नवीन अग्निशमन केंद्र सुरू करणार असून, या केंद्रांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सध्या अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने १८ कर्मचारी आऊटसोर्सिंग करून भरण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सांगितले. 

औरंगाबाद - महानगरपालिका शहराच्या विविध भागांत पाच नवीन अग्निशमन केंद्र सुरू करणार असून, या केंद्रांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सध्या अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने १८ कर्मचारी आऊटसोर्सिंग करून भरण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सांगितले. 

सभापतींच्या दालनात गुरुवारी (ता.२२) अग्निशमन विभागाची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली, उपायुक्त अय्युब खान, रवींद्र निकम, अग्निशमन विभागाचे प्रमुख सुरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अग्निशमन विभागाच्या वतीने वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा सभापतींसमोर मांडला तसेच तातडीच्या सेवेसाठी म्हणून या विभागातील कर्मचारी ओव्हर टाइम करतात, मात्र त्यांना भत्ता देण्यात येत नाही, सध्या विभागात फायरमनची, नवीन केंद्रांसाठी, वाहनांची आवश्‍यकता आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठीचा डीपीआर, पाच प्रस्तावित अग्निशमन केंद्रे याविषयी बैठकीत चर्चा झाली. यानंतर सभापती बारवाल यांनी सांगितले, फायरमन आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याची परवानगी आयुक्तांशी चर्चा करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शासनाकडे प्रलंबित असलेला ४८ कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, एमआयडीसीकडून नवीन वाहने मिळावीत यासाठी प्रयत्न करणार आहे. अतिरिक्‍त काम करणाऱ्यांना ओव्हर टाइम भत्ता देण्यासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

 तसेच शहागंज, गोलवाडी, हर्सूल नाका, टी. व्ही. सेंटर, रोजाबाग या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच हे काम मार्गी लागेल, असे सांगून २०१४ ते १५ कालावधीत अग्निशमन सेवा घेणाऱ्या विविध कार्यालयांकडे मिळून सुमारे २९ लाख २६ हजार ५०० रुपयांची थकबाकी असल्याचेही आजच्या आढावा बैठकीत समजल्याचे ते म्हणाले. 
 

एनओसीच्या फाईल येणार विभागप्रमुखांकडे 
अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळविण्यासाठी दाखल झालेली काही प्रकरणे प्रलंबित होती, याची माहिती घेण्यात आली. मुख्य अग्निशमन अधिकारीच फायर एनओसी देत, मात्र यापुढे एनओसीची प्रत्येक फाईल उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडूनच मंजूर करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. अग्निशमन विभागाने एनओसी दिलेल्या इमारतींची लवकरच पाहणी करणार आणि त्यात काही त्रुटी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. लवकरच अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आपण पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, मुंबई आणि नाशिक महापालिकांचा दौरा करणार असल्याचे श्री. बारवाल यांनी सांगितले. 

Web Title: aurangabad marathwada news 5 firebrigade center tender process