जयाजींच्या बंगल्यावर मराठा संघटनांची धडक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

जाब विचारणार : संतप्त कार्यकर्त्यांनी फेकले घराच्या दिशेने टमाटे

जाब विचारणार : संतप्त कार्यकर्त्यांनी फेकले घराच्या दिशेने टमाटे
औरंगाबाद - गुरुवारपासून (ता. एक) सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप परस्पर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर जयाजी सूर्यवंशी राज्यभर टीकेचे धनी ठरले आहेत. अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि किसान क्रांतीचे राज्य समन्वयक असलेल्या जयाजी यांनी रविवारी (ता. चार) आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी औरंगाबादेतील समन्वयकांची बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र, स्वत: संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने संतापलेल्या शेतकरी, मराठा संघटनांनी त्यांच्या बंगल्यावर धाव घेतली. यावेळी घोषणाबाजी करीत घराच्या दिशेने टमाटे, भेंडी, बटाटे फेकून रोष व्यक्‍त केला.

शेतमालास हमीभाव, कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे मोठी कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटेपर्यंत बैठक घेतली. या बैठकीस जयाजी हजर होते. त्यानंतर या बैठकीत 70 टक्के मागण्या मान्य झाल्यामुळे संप मागे घेत असल्याची घोषणा जयाजींनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ज्या शेतकरी नेत्यांशी चर्चा केली त्यांच्यावर आपला विश्‍वासच नाही, ते फितूर झाले आहेत, असा संतप्त सवाल राज्यभरातून विचारण्यात आला. जयाजी यांच्यासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला हजर असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकाऱ्यांचे पुतळे जाळण्याचे प्रकार ठिकठिकाणी सुरू होते. शेतकऱ्यांचा उद्रेक आणि संताप पाहून जयाजी यांनी शनिवारी (ता. तीन) माध्यमांशी बोलताना संप मागे घेण्याचा निर्णय आपण घाईत घेतल्याची कबुलीही दिली होती. आपल्याला पश्‍चात्ताप होत असून, शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला; तर आपण त्यांच्यासोबत असू, असे सांगत आपल्याविरुद्धचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रविवारी औरंगाबादेत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, बैठक झालीच नाही. त्यामुळे संतापलेल्या मराठा संघटनांचे प्रतिनिधी माणिकराव शिंदे, रमेश केरे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, संजय सावंत, रमेश गायकवाड, शुभम केरे, किशोर मराठे, विशाल पवार, अप्पासाहेब कुढेकर, उबाळे या कार्यकर्त्यांनी जयाजी यांच्या बंगल्यावर धडक मारत घोषणाबाजी केली.

जयाजी यांचा शोध सुरू
किसान क्रांतीच्या समन्वयकांची बैठक ते आपल्या घरी घेतील, असा अंदाज लावून काही संघटना त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. या बैठकीत ते काय खुलासा करतात, संप मागे घेण्याचा निर्णय त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतला, अशा अनेक प्रश्‍नांचे उत्तर त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आंदोलक शेतकरी त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेऊन ते स्वतःच गायब झाले असल्याचे त्यांच्या आंदोलनातील सहकारी सांगत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news