भारनियमनमुक्तीसाठी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शहरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात महावितरण प्रादेशिक कार्यालयासमोर शनिवारी (ता. १६) शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. भारनियमन रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी आक्रमक झालेल्या शिवसेना, एमआयएमच्या कार्यकत्यांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

औरंगाबाद - शहरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात महावितरण प्रादेशिक कार्यालयासमोर शनिवारी (ता. १६) शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. भारनियमन रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी आक्रमक झालेल्या शिवसेना, एमआयएमच्या कार्यकत्यांनी महावितरणविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

राज्यातील सर्वच विभागांत भारनियमन करण्यात येत आहे. तब्बल नऊ किंवा त्यापेक्षाही अधिक तास भारनियमन ठेवण्यात येत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. तत्पूर्वी, सकाळी आंदोलनासाठी आलेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी महावितरणच्या गेटवरच रोखले गेले. शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी आले होते. शिवेसेनेतर्फे गेटवर चढत जोरदार घोषणा देत महावितरण कारभाराचा निषेध करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपमहापौर स्मिता घोगरे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले, विजय वाघचौरे, शहरप्रमुख विश्‍वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, राजू वैद्य आदींसह नगरसेविका, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

‘एमआयएम’तर्फे आंदोलन
आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला फिरोज खान, नासेर सिद्दीकी, सय्यद अजीम, आरेफ हुसेनी, सय्यद, मतीन, श्री. जफर, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष ए. आर. शेख नाईकवाडी यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कोळशाअभावी वीज निर्मितीत घट झाली आहे. ही घट कमी करण्यासाठी भारनियमन करावे लागत आहे. परिणामी शहरात वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सर्व पक्ष, संघटना, नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.

एकीकडे सरकार बुलेट ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे पाणी आणि विजेसाठी नागरिकांना, महिलांना रात्रभर फिरावे लागत आहे. गरिबांनी वीजबिल भरले नाही तर त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो, मात्र श्रीमंतांकडे लाखो रुपयांचे बिल थकले असताना सरकार त्यांना सवलत देते, ही शरमेची बाब आहे. 
- इम्तियाज जलील, आमदार

Web Title: aurangabad marathwada news agitation for loadshading free