पीक कर्ज वाटपाला राष्ट्रीयीकृत बॅंकांचा ठेंगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

-औरंगाबाद विभागात सरासरी 13.76 टक्के वाटप
- राष्ट्रीयीकृत बॅंकांनी वाटले फक्त 9.91 टक्के कर्ज

-औरंगाबाद विभागात सरासरी 13.76 टक्के वाटप
- राष्ट्रीयीकृत बॅंकांनी वाटले फक्त 9.91 टक्के कर्ज

औरंगाबाद - जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असून, शेतकऱ्यांना दहा हजारांचे पीककर्ज देण्यास बॅंका तयार नाहीत. जोपर्यंत हाती लेखी आदेश येत नाही, तोपर्यंत कर्ज देण्यास बॅंकांनी असमर्थतता दाखविली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनीही पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांना ठेंगा दाखविला आहे. औरंगाबाद विभागात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आतापर्यंत फक्त 9.91 टक्के, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी 31.45 टक्केच कर्जाचे वाटप केले आहे. विभागात सर्व बॅंकांनी सरासरी 13.76 टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

कर्जमाफी होण्याची आशा असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील पीककर्ज न भरता कर्जमाफी आदेशाची वाट बघितली. आता शासनाने गेल्या आठवड्यात कर्जमाफी जाहीर केली; मात्र शेतकऱ्यांना दहा हजारांचे पीककर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. दहा हजारांच्या कर्जासाठी शेतकरी बॅंकेत येतो. मोठ्या अपेक्षेने आलेल्या शेतकऱ्याला रिकाम्या हाताने परतावे लागते. मागील कर्ज भरल्याशिवाय बॅंका नवीन पीककर्ज देण्यास तयार नाहीत. कर्जमाफीचे बॅंकांकडे अद्यापही लेखी आदेश आलेले नाहीत. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यांत खरिपाच्या पीककर्जाचे उद्दिष्ट चार हजार 643 कोटी रुपयांचे आहे. त्यापैकी फक्त 239 कोटी रुपयांचेच कर्ज वाटप झाले आहे. औरंगाबाद विभागात सरासरी 13.76 टक्केच पीककर्जाचे वाटप झाले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ठेंगा दाखवत तीन हजार 208 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी फक्त 317 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी पक्त 9.91 टक्के आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी 876 कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी फक्त 275 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यांची टक्केवारी 31.45 टक्के आहे.

औरंगाबाद विभागातील बॅंकांचे पीककर्ज वाटप (17 जूनपर्यंत, रक्कम कोटीत)
जिल्हे...................उद्दिष्ट.......................वाटप................टक्केवारी

औरंगाबाद.............1201.......................252.........................20.98
जालना................1155.........................106........................9.20
परभणी................1400.........................216.......................15.48
हिंगोली...............885............................63..........................7.21

Web Title: aurangabad marathwada news agriculture loan distribution nationalise bank