सुपीक जमिनींच्या बचावासाठी अलाईनमेंटची तपासणी - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

औरंगाबाद - ‘‘समृद्धी महामार्गात जाणाऱ्या सुपीक जमीन वाचाव्यात यासाठी महामार्गाची अलाईनमेंट तपासून शेतकऱ्यांशी चर्चा करू,’’ असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यातून तोडगा निघाल्यास शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे सूचक वक्तव्यही त्यांनी या वेळी केले. 

औरंगाबाद - ‘‘समृद्धी महामार्गात जाणाऱ्या सुपीक जमीन वाचाव्यात यासाठी महामार्गाची अलाईनमेंट तपासून शेतकऱ्यांशी चर्चा करू,’’ असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यातून तोडगा निघाल्यास शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे सूचक वक्तव्यही त्यांनी या वेळी केले. 

एकनाथ शिंदे यांनी  गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथील समृद्धी महामार्ग बांधित शेतकऱ्यांशी गावात जाऊन प्रत्यक्ष चर्चा केली. या वेळी पळशी शहर, कच्ची घाटी, गंगापूर जहांगीर, वरुड काजी, पोखरी, कोलठाणवाडी, नायगाव आदी गावांतून आलेल्या शेतकऱ्यांनी आपले म्हणणे श्री. शिंदे यांच्यासमोर मांडले. यात दामोदर शेळके, दादा पाटील पळसकर, नानासाहेब पळसकर यांनी हा महामार्ग अन्य गावांमधून वळवण्याची विनंती केली. यात घरे, विहिरी, शेती ही उपजीविकेची साधने जात असल्याने आपण भूमिहीन होणार आहोत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. यानंतर श्री. शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना पळशी शहर येथील सुपीक जमिनी वाचविण्यासाठी प्रयत्न करू, शेतकऱ्यांच्या चांगल्या जमिनी घेऊन आणि त्यांच्या सहकार्याशिवाय या जमिनी सरकार घेणार नसल्याचे सांगितले. पळशीतील जमिनींना वाचविण्यासाठी रस्त्याचे अलाईनमेंट तयार करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी अलाईनमेंटमध्ये काय बदल करता येईल यावर चर्चा करू असे आश्‍वासन त्यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिले; पण त्यानंतरही मार्ग निघाला नाही तर शेतकऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवावी, असे सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी बोलताना केले. दरांबद्दल असलेल्या तक्रारींचा सकारात्मक विचार करू आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या समितीसमोर हा विषय मांडू, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. या दरम्यान त्यांनी या रस्त्याच्या नकाशांची तपासणी केली आणि नव्या, जुन्या सगळ्याच रस्त्यांचा उल्लेख असलेल्या नकाशाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, अशोक शिंदे, शहर प्रमुख विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे आदींची उपस्थिती होती. 

टांगती तलवार कायम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही काही दिवसांपूर्वी पळशी आणि माळीवाडा या समृद्धी महामार्गग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधला होता. त्या वेळी सुपीक जमिनींवर वरवंटा फिरवून महामार्ग होणार असेल तर असा मार्ग आम्हाला नको, असे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले; पण त्यानंतर शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे ते म्हणाले. शिवसेनेच्याच मंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जमिनीवरील टांगती तलवार अद्यापही कायम असल्याचे जाणवते.

हळूच सांगितली एक कोटीची ‘ऑफर’
पळशी गावातील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यासाठी एकीकडे कडाडून विरोध करीत आंदोलनाचे शस्त्र उपसल्याने अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. असे असताना काही शेतकऱ्यांनी हळूच आपली ‘ऑफर’ गावात आलेल्यांना बोलून दाखविली. दराबाबत नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले, की एक कोटी रुपये भाव द्या, जमिनी देतो. त्यावर भेटून बोलू, असे उत्तर मिळाल्यावर काही क्षणांची भेट संपून सगळे नामानिराळे झाले.

 

Web Title: aurangabad marathwada news alighment cheaking for land saving