अबरारवर विरोधात आरोप निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

औरंगाबाद - दहशतवादी कारवायांसाठी शहरात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी हिमायतबाग येथे दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) गोळ्या झाडल्या होत्या. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला होता. या चकमकीदरम्यान पकडण्यात आलेला संशयित अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबुखा विरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. विशेष न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे.

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील फरारी दहशतवादी शहरातील हिमायतबागेत आल्याची माहिती "एटीएस'च्या पथकाला 26 मार्च 2012 रोजी मिळाली होती. त्यानुसार "एटीएस'चे तत्कालिन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांचे पथक दुपारी हिमायतबागेत दाखल झाले होते. त्यावेळी संशयित दहशतवादी दिसताच त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिस पथकांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला.

या चकमकीमध्ये जमादार शेख आरेफ यांच्या खांद्याला गोळी लागून ते गंभीर जखमी झाले; तर पोलिसांच्या गोळ्यांनी संशयित दहशतवादी अजहर ऊर्फ खलील कुरेशी हा ठार झाला; तर दुसरा संशयित महंमद शाकेर याच्या पायाला गोळी लागली. त्या वेळी पोलिस अधीक्षक रेड्डी यांनी पाठलाग करून अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ इस्माईल ऊर्फ अब्दुल बाबुखा (रा. चंदननगर इंदौर, मध्य प्रदेश) यास पकडले होते. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपास करून अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (रा. लाभारिया इंदौर मध्य प्रदेश) यालाही गजाआड केलेले आहे. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून गावठी कट्टे, रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतूस जप्त केले होते. या तिघांच्या विरोधात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणांवर 24 जुलैला सुनावणी अपेक्षित आहे.

Web Title: aurangabad marathwada news The allegations against Abrar