आता मल्टिप्लेक्‍समध्ये पोळी-भाजीही नेता येणार - अरुण देशपांडे

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

औरंगाबाद - सिनेमागृहात अन्नपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास होणारा मज्जाव आता चालणार नाही, असे स्पष्ट करत यापुढे आत पोळी-भाजीही घेऊन जाता येणार आहे. त्यासंबंधीची नियमावली येत्या आठवडाभरात प्रवेशद्वारातच लावली जाईल, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी (ता. सहा) पत्रकार परिषदेत दिली. 

औरंगाबाद - सिनेमागृहात अन्नपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास होणारा मज्जाव आता चालणार नाही, असे स्पष्ट करत यापुढे आत पोळी-भाजीही घेऊन जाता येणार आहे. त्यासंबंधीची नियमावली येत्या आठवडाभरात प्रवेशद्वारातच लावली जाईल, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी (ता. सहा) पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. देशपांडे म्हणाले, आपली फसवणूक होत असल्याचे ग्राहकाच्या लक्षात आल्यास त्याने जरा मोठ्या आवाजातच संबंधिताच्या लक्षात आणून द्यायला हव्यात. आपला आवाज चढवावाच लागेल. शहरातील सिनेमागृहांत बाहेरील पाणी, खाद्यपदार्थ घेऊन जाऊ दिले जात नाही. नियमानुसार सिनेमागृहचालकास असे करता येत नाही. त्यांच्याकडे केवळ मनोरंजनाचीच म्हणजे सिनेमा दाखविण्याची परवानगी असते. त्यामुळे पॉकेटबंद अन्नपदार्थांसह पाणी तसेच पोळी-भाजीदेखील घेऊन जाता येईल. त्यासंबंधीचे नियमच सिनेमागृहाच्या प्रवेशद्वारातच लावले जातील. जर कुणी मज्जाव करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

अशाप्रकारे निर्बंध करणे म्हणजे ग्राहक संरक्षणाच्या नियमांची पायमल्लीच ठरणार आहे. तक्रार करूनही काहीही कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरसुद्धा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

पुरवठा अधिकाऱ्यांकडे करा तक्रार
सिनेमागृहात जर अन्नपदार्थ घेऊन जाण्यास मज्जाव केला तर सिनेमा सोडून द्या, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करा. त्याची चौकशी केली जाईल. प्रसंगी तिकिटाची रक्‍कमही संबंधिताकडून वसूल केली जाईल, असेही श्री. देशपांडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात खरेच सिनेमागृहचालकांच्या मनमानीला चाप लागेल काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विद्यार्थ्यांकडून पार्किंग घेतल्यास कारवाई
ग्राहकांच्या मूलभूत हक्‍क, अधिकाराकडे लक्ष वळवत जिल्हाधिकारी कार्यालयातच पार्किंग वसूल केली जाते असे निदर्शनास आल्यानंतर ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही पार्किंग शुल्क घेऊ नये. विद्यार्थी, पालकांनी तक्रारी केल्या तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. देशपांडे यांनी दिली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम उपस्थित होते.

Web Title: aurangabad marathwada news arun deshpande talking