बॅंक व्यवस्थापकाचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार

औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र नारायण होळकर (वय ४७) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांनी रात्री उशिरा सांगितले.

देवळाई परिसरातील घटना; धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर वार

औरंगाबाद - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शेकटा शाखेच्या व्यवस्थापकाची राहत्या घरातच गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) देवळाई परिसरातील छत्रपतीनगरमध्ये घडली. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जितेंद्र नारायण होळकर (वय ४७) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याचे पोलिसांनी रात्री उशिरा सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की जितेंद्र होळकर हे घरातील एका खोलीत, तर पत्नी भाग्यश्री व मुलगा यश दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. रात्री दीड ते दोनच्या सुमारास होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर पत्नीने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, रूमला बाहेरून कडी लावलेली होती. त्यामुळे त्यांनी शेजारी असलेल्या श्रीराम कुलकर्णी आणि पाठक यांना मोबाईलवरून हा प्रकार सांगितला. त्यानंतर श्री. कुलकर्णी यांनी धाव घेतली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. हॉलच्या मागच्या एका रूममध्ये जितेंद्र यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर त्यांनी भाग्यश्री यांच्या रूमचा दरवाजा उघडला. त्यानंतर याबाबत माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत श्री. होळकर यांना सकाळी सव्वापाचच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टारांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय त्यांच्या मूळ गावी नगरच्या शेवगाव तालुक्‍यातील कांबी (हदगाव) येथे रवाना झाले.

पंचनाम्यात त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हातावर व गळ्यावर दोन वार आढळले. खांद्यावरही जखमा असून हल्लेखोरांनी दोरी आणि उशीचाही वापर केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसले आहे. दरम्यान, पोलिसांनी जितेंद्र आणि भाग्यश्री याचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जलदगतीने सूचना दिल्याने श्वान पथक आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच सायबर सेल आणि गुन्हेशाखेचे पथकही या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करीत आहे.

‘बाबांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे प्रॉमिस करा’
गावी निघताना मुलगा यश हा उपायुक्त राहुल श्रीरामे यांना ‘माझ्या बाबांच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे प्रॉमिस करा’, अशी विनवणी करीत होता. श्री. श्रीरामे यांनी यशला धीर देत ‘या प्रकरणाचा छडा लावू’, अशी ग्वाही दिली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

वर्षभरापूर्वीच झाले होते प्रमोशन
शेकटा येथील शाखेत दोन वर्षे कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र होळकर यांना वर्षभरापूर्वीच व्यवस्थापकपदी बढती मिळाली होती. त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. छत्रपतीनगर येथील दोन मजली घरात १५ वर्षीय मुलगा यश आणि पत्नीसह ते राहत होते. तर मुलगी साक्षी ही शिक्षणासाठी बाहेरगावी आहे. 
 

सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी 
पोलिस आयुक्त यशस्वी यादव घटनास्थळाची पाहणी केली. उपनिरीक्षक हरीश खटावकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. विपुल देशपांडे यांच्या दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये रात्री १.१७ ला एका दुचाकीवर स्वार होऊन दोनजण होळकर यांच्या घराकडे आल्याचे दिसून आले. मात्र, हे फुटेज स्पष्ट नसल्याने ओळख पटू शकली नाही. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

मारेकऱ्यांच्या प्रवेशाचे गूढ कायम 
घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे मारेकरी हे वरच्या मजल्यावरून घरात शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु त्यासंबंधी पोलिसांना सबळ पुरावे आढळलेले नाहीत. त्यामुळे मारेकऱ्यांनी घरात प्रवेश कसा केला, याविषयीचे गूढ कायम आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन जिने आहेत. एक हॉलमधून, तर दुसरा जिना घराच्या बाहेरून आहे. बाहेरच्या जिन्याने हॉलमध्ये येता येत नाही. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा किंवा दुसऱ्या मजल्यावरून घरात मारेकरी शिरल्याचा संशय आहे.

Web Title: aurangabad marathwada news bank manager murder