बळीराजाच्या आंदोलनाला शहरांचीही साथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मराठवाड्यात "बंद'ला मोठा प्रतिसाद, 18 बसवर दगडफेक

मराठवाड्यात "बंद'ला मोठा प्रतिसाद, 18 बसवर दगडफेक
औरंगाबाद - शेतकरी संपादरम्यान दिलेल्या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील सारे व्यवहार ठप्प झाले, तर शहरांतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांसह अन्य घटकांनीही बळीराजाच्या आंदोलनाला साथ दिली. उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत एकूण 18 बसवर दगडफेकीचे प्रकार घडले.

ठिकठिकाणी रास्ता रोको, मोर्चा, प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकण्यासह घोषणांनी ग्रामीण भागातील रस्ते, चौक ढवळून गेले. भाजप वगळता अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

उस्मानाबाद जिल्हा
- जिल्ह्यात संपाला मोठा प्रतिसाद
- मोहा, मस्सा (खंडेश्वरी) (ता. कळंब), ईट (ता. भूम) लोहारा आदी सात ठिकाणी बसवर दगडफेक, पाथरूड (ता. भूम) येथे ट्रकवर दगडफेक.
- उस्मानाबाद शहरात संमिश्र, भूम, तुळजापूर, परंडा, कळंब तालुक्‍यांत कडकडीत बंद.
- सरमकुंडी (ता. वाशी), मलकापूर (ता. कळंब), पाडोळी (आ.), खेड (ता. उस्मानाबाद), कळंब येथे "रास्ता रोको'
- कळंब, वालवडचा आठवडे बाजार भरलाच नाही.
- अंतरगाव (ता. भूम) ः गाड्या अडवून दूध, भाजीपाला फेकला
- मलकापूर पाटी (ता. कळंब) ः सदाभाऊ खोत, जयाजी सूर्यवंशी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन
- संपाला पाठिंब्यासाठी उस्मानाबादेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांचे साखळी उपोषण

लातूर जिल्हा
- लातूरमध्ये चक्काजाम आंदोलन
- 47 कार्यकर्त्यांची अटक, सुटका
- शिवसेनाही उतरली रस्त्यावर
- शेतकरी संघटना, शेकाप, "छावा'चा सहभाग
- पाचव्या दिवशीही अडत बाजारात सौदा नाही
- भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली

बीड जिल्हा
- बीडमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले
- निषेध फेरी, दूध रस्त्यावर ओतले
- जातेगाव (ता. गेवराई) येथे दुग्धाभिषेक, आंदोलक टॉवरवर चढले
- दूध संकलन पाचव्या दिवशीही बंद
- बीडमधील सुभाष रोड, मोंढा, धोंडीपुरा बाजारपेठा बंद
- ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
- तालखेड (ता. माजलगाव), धारूरला रास्ता रोको
- धारूरमध्ये आंदोलकांचा रस्त्यावरच अल्पोपाहार
- अंबाजोगाईत दुचाकी फेरी.
- कडा (ता. आष्टी), सिरससदेवी (ता. गेवराई) येथे दूध फेकले

औरंगाबाद जिल्हा
- जिल्ह्यात गावोगावी आंदोलनाचे लोण
- औरंगाबाद बाजार समितीचे व्यवहार ठप्प
- बाजार समितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांकडून "बंद'चे आवाहन
- जुना मोंढ्यातील व्यवहारावर परिणाम
- जिल्ह्यातील दूध संकलनात चाळीस टक्के घट
- शहरातील किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमतींत वाढ
- आंदोलनास पाठिंब्यासाठी विविध संघटनांचे शहागंज, गांधी पुतळा येथे धरणे
- संपाला पाठिंब्यासाठी विद्यापीठात "एसएफआय'तर्फे लाक्षणिक उपोषण

- जालना बाजार समितीचे व्यवहार बंद
- शहरांमधील व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद
- अंबड, घनसावंगी, मंठा येथे कडकडीत बंद
- तीर्थपुरी, राजूर, जामखेड, वरूड, घनसावंगी, चिंचोली, मंठा, पारध, जामखेडा, कुंभार पिंपळगाव, आष्टी आदी ठिकाणी कडकडीत बंद
- मंठा येथे कॉंग्रेस, शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
- शहरी जनजीवनावर परिणाम

नांदेड जिल्हा
- नांदेड शहरात तरोडा खुर्द येथे सामूहिक मुंडन
- छत्रपती चौक वाडीत शिवसेनेतर्फे भाजीपाला, दूध रस्त्यावर ओतून निषेध
- अनेक ठिकाणी रास्ता रोको, देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन
- उमरीत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
- भोकरला नव्या मोंढ्यातील दुकाने दिवसभर बंद.
- मुदखेडमध्ये व्यापाऱ्यांचा "बंद'ला पाठिंबा.
- देगलूरला शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, प्रहार, "छावा'चाही सहभाग
- कंधार बंदला संमिश्र प्रतिसाद, आठवडे बाजार प्रभावित.
- इस्लापूर (ता. किनवट) मुख्य चौकात रास्ता रोको.
- बारडमध्ये (ता. मुदखेड) महामार्गावर रास्ता रोको.
- जिल्ह्यात सात बसची तोडफोड, नुकसान करणाऱ्यांविरुद्ध महामंडळाकडून गुन्हे
- लोह्यात कॉंग्रेस, विविध संघटना, व्यापारी संघाचा पाठिंबा

हिंगोली जिल्हा
- जिल्हाभरात कडकडीत बंद
- ठिकठिकाणी रास्ता रोको, भाजीपाला, दूध फेकले
- कळमनुरी तालुक्‍यातील कामठा येथे एक, पार्डी मोड येथे दोन बसवर दगडफेक
- मसोडा (ता. कळमनुरी) येथे जाळपोळ.
- वसमतमध्ये शेतकरी मोर्चा
- जिल्हाभरात बाजारपेठ पूर्णपणे ठप्प
- भाजप वगळून सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग

परभणी जिल्हा
- परभणी शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद
- ठिकठिकाणी रास्ता रोको
- आंदोलन करून नवरदेव चढला बोहल्यावर
- भाजीपाल्यासह सर्व बाजारपेठांतील व्यवहार ठप्प
- जिल्ह्यातील एसटीच्या 114 फेऱ्या रद्द

Web Title: aurangabad marathwada news city support to farmer agitation