वाढली स्पर्धा, वाढले क्‍लासेस!

वाढली स्पर्धा, वाढले क्‍लासेस!

मराठवाड्यातील चित्र - शहरी भागात शैक्षणिक ते छंद वर्गांपर्यंत रेलचेल

औरंगाबाद / नांदेड - खासगी शिकवण्यांना दिवसेंदिवस अधिक महत्त्व प्राप्त होत असून, अगदी ग्रामीण भागापर्यंत ते पोचल्याचे मराठवाड्यातील चित्र आहे. वाढती स्पर्धा, टक्केवारीची आस, पालकांचा वाढलेला कल आदींमुळे शाळा-महाविद्यालयांतून आल्यानंतर मुले क्‍लासची वाट धरताना दिसतात. याआधीच मुहूर्तमेढ रोवलेल्या क्‍लासेसची आता संस्थाने झाली आहेत.

चांगल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला तरी खासगी शिकवणी लागतेच, असा समज विद्यार्थ्यांसह पालकांचाही असल्याने शिकवणीवर्गांना जात नाहीत, असे विद्यार्थी सापडणे आता अवघड झाले आहे. विद्यार्थी, पालकांची गरज लक्षात घेऊन खासगी शिकवणीचालकही दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यावर भर देताना दिसतात.

मराठवाड्यातील औरंगाबादसह लातूर, नांदेड सध्या शिक्षणाचे हब बनले आहे. त्यामुळे दर्जेदार शैक्षणिक संस्थांसह शिकवणीवर्गांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमूक एक विद्यार्थी त्या क्‍लासला जातो, म्हणून आपलाही मुलगा तेथेच गेला पाहिजे, असा पालकांचा आग्रह असतो. त्यामुळे कितीही शुल्क भरून, गैरसोय सहन करून त्याच क्‍लासेसच्या वर्गात प्रवेश घेण्यावर भर दिला जातो. नावाजलेल्या क्‍लासमध्ये पाल्याचा प्रवेश घेणे हे अनेक पालकांचे स्वप्न असते. अशा क्‍लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे आपल्या पाल्याचे करिअरच घडले, अशीच अनेक पालकांची धारणा असते. त्यामुळेच क्‍लासचे महत्त्व वाढल्याचे दिसते. 

दहावी, बारावीचे निकाल लागले, की शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशाबरोबरच क्‍लासेसच्या प्रवेशांची देखील विद्यार्थी व पालकांची धांदल उडते. पहिलीपासून ते दहावी, बारावी, इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पर्धा परीक्षा, अबॅकस, इंग्लिश स्पीकिंग यांसह नृत्य, गायन, वादन, चित्रकला, छंद आदींचे बहुतांश शहरांत शेकडो क्‍लासेस आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून तेथेही शिकवणीवर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. 

शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये मोठी दरी आहे. दहावी, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्याला प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांतून विद्यार्थ्याला जावे लागते. त्याची तयारी शिकवणीवर्गांतून केली जाते. त्यामुळेच पालकांचा शिकवणीवर्गांकडे कल वाढला आहे.
- गोविंद काबरा, डीएफसी, औरंगाबाद

सध्या कुठल्याही क्षेत्रात जायचे झाल्यास स्पर्धा परीक्षांतून जावे लागते. अलीकडे वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. शिकवणीमध्ये टॉपिकवाईज तयारी होते. त्यामुळे अभ्यासात सातत्य असते. शालेय, महाविद्यालयीन स्तरावरच विद्यार्थ्यांची तयारी होत असल्याने, ‘जेईई’, ‘नीट’सारख्या परीक्षा विद्यार्थी सहज उत्तीर्ण होत असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचेही ‘आयआयटी’ला जाण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
- प्रा. डॉ. नागेश कल्याणकर, नांदेड

‘मेरिट’प्रमाणे प्रवेश
महाविद्यालयात प्रवेश घेताना ज्याप्रमाणे ‘मेरिट’ची गरज भासत आहे, त्याप्रमाणे नावाजलेल्या खासगी ‘क्‍लासेस’मध्येही ‘मेरिट’ प्रमाणेच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी राज्य ‘सीईटी’, तसेच केंद्रीय पातळीवर ‘जेईई’ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ या प्रवेश परीक्षा घेते.  त्यामुळे  शहरात खासगी क्‍लासची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘जेईई’, ‘नीट’ परीक्षेसाठी पूर्ण तयारी करून घेत असल्याचे क्‍लासचालक सांगतात. त्यामुळे मुलांसाठी शिकवणी लावण्यावर पालकांचा भर आहे.

ट्रेंड वाढताच
व्यावसायिक अभ्यासक्र, स्पर्धा परीक्षा किंवा अन्य छंद वर्गांच्या क्‍लासेसचे प्रमाण वाढते असले तरी अलीकडे हा ट्रेंड अगदी प्राथमिक शिक्षणापासून सुरू झाल्याचे दिसते. पुढील वर्ग सोपे जावेत, असा पालकांचा त्यामागचा हेतू असल्याचे सांगितले जाते. शिष्यवृत्तीनिमित्त क्‍लासेस, दहावीची पूर्वतयारी म्हणून नववीचे क्‍लासेस, अकरावी, बारावीसाठी तर बहुतांश विषय आणि आगामी एंटरन्स परीक्षांचे क्‍लासेस अशी ही चढती कमान आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी कुठल्या तरी ‘क्‍लास’मध्ये गुंतलेले दिसतात.

खासगी शिकवणी वर्गांचे शुल्क गेल्या पाच वर्षांत वाढले आहे. मूल अभ्यासात मागे राहू नये म्हणून काही शाळा, महाविद्यालये पालकांवर जबाबदारी टाकतात. परिणामी खासगी शिकवणीचा आधार घ्यावा लागतो. महाविद्यालयात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेला तर सामान्य पालकांवर पडणारा अतिरिक्त खर्चाचा बोजा काही प्रमाणात हलका होऊ शकतो.
- दिनकर रावते, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com