राज्यातील मक्‍याचे उत्पादन घटणार

शेखलाल शेख
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांना बसणार मोठा आर्थिक फटका
औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा राज्यातील मका उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे. मात्र, यंदा आतापर्यंत पडलेल्या अल्प पावसाने उत्पादनात 25 ते 30 टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता आहे.

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांना बसणार मोठा आर्थिक फटका
औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा राज्यातील मका उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे. मात्र, यंदा आतापर्यंत पडलेल्या अल्प पावसाने उत्पादनात 25 ते 30 टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता आहे.

राज्यात वर्ष 2015-16 मध्ये खरीप हंगामात मक्‍याची 7 लाख 89 हजार हेक्‍टरवर लागवड झाली. वर्ष 2016-17 मध्ये 17 टक्‍क्‍यांची वाढ होऊन त्याचे क्षेत्र 9 लाख 21 हजार हेक्‍टर झाले. वर्ष 2015-16 मध्ये राज्यात मक्‍याचे 11 लाख 60 हजार टन उत्पादन झाल होते; तर 2016-17 मध्ये यामध्ये 153 टक्‍क्‍यांची वाढ होऊन उत्पादन 29 लाख 35 हजार टन झाले होते. यामध्ये सर्वाधिक वाटा हा औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांचा होता. मात्र, यंदाच्या दुष्काळी स्थितीने हा वाटा कमी होणार आहे.

मराठवाड्यात कपाशीनंतर मक्‍याला सर्वाधिक पसंती दिली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात साधारणपणे दरवर्षी पावणेदोन लाख हेक्‍टरवर मक्‍याची पेरणी होते. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्‍यांत यात केवळ 8 ते 10 हेक्‍टरने वाढ झाली आहे. साधारणपणे मागच्या वर्षीपेक्षा औरंगाबाद जिल्ह्यात पाच ते दहा हेक्‍टरने मक्‍याच्या क्षेत्रात वाढ झाली. औरंगाबाद जिल्ह्यात मक्‍याला साधारपणे 20 ते 25 क्विंटल; तर काही शेतकऱ्यांना 30 ते 40 क्विंटलपर्यंत उतारा मिळतो. राज्याच्या उत्पादकतेपेक्षा औरंगाबाद जिल्ह्याची सरासरी उत्पादकता जास्त आहे. यंदा दुष्काळी स्थितीने उताऱ्यामध्ये मोठी घट होणार आहे.

रब्बीतील मका अधांतरी
खरीप हंगामासोबत रब्बी; तसेच उन्हाळी हंगामातसुद्धा मक्‍याचे उत्पादन घेतले जाते. वर्ष 2015-16 मध्ये रब्बी हंगामात राज्यात 2 लाख 49 हजार हेक्‍टर, तर वर्ष 2016-17 मध्ये 2 लाख 228 हजार हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली होती. वर्ष 2015-16 मध्ये रब्बी हंगामातील मक्‍याचे राज्यात 4 लाख 61 हजार मेट्रिक टनांचे उत्पादन झाले; तर 2016-17 या वर्षात हे उत्पादन वाढून 5 लाख 50 हजार मेट्रिक टनांपर्यंत गेले होते. आता जोरदार पाऊस झाला; तर मक्‍याचे पीक काही प्रमाणात वाचून उत्पादन येईल. मात्र, आता पाऊस झाला नाही, तर खरिपातील हातातून गेलेले मक्‍याचे पीक रब्बीत येण्याची शक्‍यता शिल्लक राहणार नाही.

Web Title: aurangabad marathwada news The corn production in the state will be reduced