जयभवानीनगरात दुसऱ्या दिवशी १४ अतिक्रमणांवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - जयभवानीनगरातील नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम गुरुवारी (ता. नऊ) दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, तब्बल १४ मालमत्तांवर हातोडा मारण्यात आला. किरकोळ प्रकार वगळता मोहीम शांततेत सुरू असून, शुक्रवारीदेखील पाडापाडी करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जयभवानीनगरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने गेल्या दोन वर्षभरापासून वॉर्डाच्या नगरसेविका मनीषा मुंडे हे अतिक्रमणे हटविण्यासाठी पाठपुरावा करीत होत्या. दरम्यान या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. सप्टेंबर महिन्यात पावसाचे पाणी शेकडो घरात घुसल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर हे अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच महापालिकेला या नाल्यातून भूमिगत गटार योजनेतील मलनिस्सारण वाहिन्या टाकणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बुधवारपासून (ता. आठ) पाडापाडीच्या कारवाईला सुरवात करण्यात आली होती. पहिल्या दिवशी चार अतिक्रमणे पाडल्यानंतर गुरुवारी सकाळी अकरापासून पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. 

अतिक्रमण विभागाचे सी. एम. अभंग आणि प्रभाकर पाठक यांच्या पथकाने कारवाई सुरू केली. सोबतीला पोलिसांचा तगडा बंदोबस्तही होता. सुरवातीला काही नागरिकांनी मार्किंगवरून आक्षेप घेत कारवाईला विरोध केला; परंतु पथकाने हा विरोध न जुमानता कारवाई सुरू केली. त्यानंतर मात्र नागरिकांनी स्वतःच अतिक्रमणे काढून घ्यायला सुरवात केली. सायंकाळपर्यंत एकूण १४ अतिक्रमणे हटविण्यात महापालिकेला यश आले. ही कारवाई पोपटराव तिवटने, दिलीप सुरे, सागर श्रेष्ठ, सचिन दुबे, रवींद्र देसाई आदींच्या पथकाने केली.

Web Title: aurangabad marathwada news crime on 14 encroachment