जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह 28 जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

आठ कोटी 52 लाखांच्या बेकायदा कर्जमाफीचे प्रकरण
52 सहकारी संस्थांना वाटले होते कर्ज
डिसेंबर 2015 ला तक्रार, तपासानंतर गुन्ह्याची नोंद
52 सहकारी संस्थेच्या सचिव, अध्यक्षांवर ठपका

आठ कोटी 52 लाखांच्या बेकायदा कर्जमाफीचे प्रकरण
52 सहकारी संस्थांना वाटले होते कर्ज
डिसेंबर 2015 ला तक्रार, तपासानंतर गुन्ह्याची नोंद
52 सहकारी संस्थेच्या सचिव, अध्यक्षांवर ठपका

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत सहकारी संस्थांना दिलेले साडेआठ कोटींचे कर्ज बेकायदेशीरपणे माफ केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळासह 28 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक मंडळातील आमदार अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, माजी आमदार नितीन पाटील, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट आदींचा यात समावेश आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने 2000 मध्ये जिल्ह्यातील 52 सहकारी संस्थांना साडेआठ कोटींचे कर्ज वाटप केले होते. बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य व त्यांच्या नातेवाइकांच्या नावे असलेल्या संस्थांना हे कर्ज देण्यात आले होते; परंतु अनेक वर्षे उलटून गेल्यावरही या संस्थांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. 2013 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असलेल्या सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने 52 सहकारी संस्थांकडे थकीत असलेले 8 कोटी 52 लाख 1 हजार 862 रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. सहकार कायद्याच्या नियमानुसार थकीत कर्जाच्या वसुलीसाठी करावी लागणारी कुठलीच कायदेशीर प्रक्रिया न राबवता परस्पर कर्जमाफी देण्याचा निर्णय त्यावेळीच्या संचालक मंडळाने घेतला होता. या प्रकरणी ऍड. सदाशिव गायके यांच्यामार्फत डिसेंबर 2015 मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर संचालक मंडळाला पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांचे रीतसर जबाब नोंदवून घेण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी नाबार्ड, सहकार विभागांना पत्र दिले होते. आर्थिक शाखेच्या प्राथमिक तपासातून या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. ऍड. सदाशिव गायके यांच्या फिर्यादीवरून संचालक मंडळातील सदस्यांसह 28 जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

बावन्न संस्थांच्या अध्यक्ष, सचिवांवर ठपका
बेकायदेशीररीत्या कर्ज माफ करण्यात आलेल्या बावन्न सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिवांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. सखोल पडताळणीनंतर याबाबत कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांनी दिली.

यांच्याविरुद्ध गुन्हा
सुरेश पाटील (अध्यक्ष), जयराम साळुंके (उपाध्यक्ष), नितीन पाटील (संचालक), बाबूराव पवार, शब्बीर खॉं पटेल, शेख अब्दुल सत्तार, लक्ष्मीनारायण जैस्वाल, संदीपान भुमरे, दशरथ गायकवाड, त्र्यंबक मदगे, शिवाजी गाडेकर, विष्णू जाधव, नानाराव कळंब, दत्तू चव्हाण, श्रीराम चौधरी, ऍड. शांतिलाल छापरवाल, अशोक पाटील, किरण पाटील, भरतसिंग छानवाल, वैशाली पालोदकर, मंदाबाई माने, वर्षा काळे, एस. पी. शेळके, (कर्मचारी संचालक), श्री वैद्य, श्री. काटकर, (सरव्यवस्थापक), ऍड. नकुले (विधी अधिकारी), राजेश्‍वर कल्याणकर (कार्यकारी संचालक), चंद्रकांत भोलाने (सीए), अशा 28 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: aurangabad marathwada news crime on suresh patil