कावळ्याच्या सुटकेचा प्रवास बीडमार्गे औरंगाबाद

अनिल जमधडे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

औरंगाबादहून व्हॉट्‌सॲपवर कावळा अडकल्याचे फोटो टाकण्यात आले, त्यामुळे घटनेचे गांभीर्य कळाल्याने तातडीने मदतीसाठी अग्निशामक दलाला कळविले. मोठ्या तत्परतेने पथकाने कावळ्याचे प्राण वाचविले, खऱ्या अर्थाने फायरब्रिगेड अभिनंदनास पात्र आहे. 
- प्रा. एस. जी. राऊत, बीड

औरंगाबाद - पक्ष्यांसाठी घातक ठरलेल्या मांजामुळे दोन दिवसांपासून एका झाडावर अडकून पडलेल्या कावळ्याचे अग्निशामक दलाच्या पथकाने प्राण वाचविले. विशेष म्हणजे कावळ्याच्या माहितीचा प्रवास बीड मार्गे औरंगाबाद असा झाल्याने, व्हॉट्‌सॲपची मदत कावळ्याचे प्राण वाचविण्यासाठी झाली. पितृपक्षात एका कावळ्याचे प्राण वाचविण्यात यश आल्याने अग्निशामक दलाच्या पथकाचे कौतुक झाले आहे. 

शहरातील एसबीआय बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल कुलकर्णी हे सरस्वती भुवन कॉलनीत राहतात. त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओंकारेश्‍वर पार्किंगमधील एका लिंबाच्या झाडावर सोमवारी (ता. १८) संध्याकाळपासून कावळ्यांची कावकाव सुरू होती. प्रचंड संख्येने कावळे लिंबाच्या झाडावर येत होते, तर अनेक कावळे कावकाव करत घिरट्या घालत होते. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी निरखून पाहिल्यानंतर एक कावळा अडकलेला दिसून आला. अडकलेल्या कावळ्याच्या सुटकेसाठी शंभरपेक्षा अधिक कावळे कावकाव करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यांचे बीड येथील स्नेही गांधीगिरी समाजसेवक संघाचे अध्यक्ष प्रा. एस. जी. राऊत यांना माहिती दिली. त्यांना कावळ्यांचे फोटोही व्हॉट्‌सॲप वरून पाठविले. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रा. राऊत यांनी औरंगाबादच्या महापालिकेच्या उद्यान विभागाला माहिती दिली, उद्यान विभागाने त्यांना फायर बिग्रेडचा फोन नंबर दिला. त्यानंतर त्यांनी फायर ब्रिगेडला माहिती दिली, विशेष म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडचे संजय कुलकर्णी, एस. एम. शकील, व्ही. बी. भाकडे, अब्दुल हमीद हे पथक घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे मदत कार्य सुरू करताच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही काळ व्यत्यय आला; मात्र पाऊस कमी होताच, फायरब्रिगेडच्या पथकाने शेजारच्या इमारतीवरून कावळ्याची सुखरूप सुटका केली. या मोहिमेदरम्यान अन्य कावळ्यांनी मात्र टोचा मारून पथकाला हुसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र मोठ्या शिताफीने कावळ्याची सुटका करण्यात आली.

Web Title: aurangabad marathwada news crow life saving